आयपीएल 2020: कोलकात्याचा अजूनही स्पर्धेत कोरबो-लोडबो-जीतबो रे...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोलकाताने राजस्थानचा ६० धावांनी पराभव करुन आयपीएलच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले. राजस्थानचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

दुबई-  कर्णधारपदास साजेशी असलेली इऑन मॉर्गनची तुफानी अर्धशतकी खेळी आणि चार विकेट मिळवणाऱ्या पॅट कमिंसने एकाच षटकांत बेन स्टोक्‍स व स्टीव स्मिथ यांना बाद करण्याचा केलेला पराक्रम यामुळे कोलकाताने राजस्थानचा ६० धावांनी पराभव करुन आयपीएलच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले. राजस्थानचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

मॉर्गनने ३५ चेंडूत ६८ धावांचा तडाखा दिला त्यामुळे निम्मा संघ ९९ धावांत गमावूनही कोलकाताने १९१ धावा उभारल्या आणि त्यानंतर राजस्थानला ९ बाद १३१ धावांत रोखले. या स्पर्धेत तिनदा १९० च्या पलिकडचे आव्हान पार करणाऱ्या राजस्थानला आज मात्र हे चक्रव्युह भेदता आले नाही.

कमिंसने पहिल्या षटकांत १९ धावा देताना उथप्पाला बाद केले त्यांतरच्या आपल्या षटकांत धोकादायक बेन स्टोक्‍स व स्मिथ यांना माघारी धाडले पाठोपाठ मावाने सॅमसनला आल्यापायी माघारी धाडले तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. जॉस बटलर मैदानात असेपर्यंत धुगधुगी कायम होती, परंतु वरुण चक्रवर्तीने डावाच्या ११ व्या षटकांत त्याला बाद केले.

दुसऱ्याच चेंडूवर नितिश राणासारखा फॉर्मात असलेला फलंदाज कोलकाताने गमावला त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली तरी कोलकाताची ५ बाद ९९ अशी अवस्था झाली होती आणि १३ षटके संपत आली होती. आंद्रे रसेलही आशा निर्माण करुन बाद झाला, परंतु कर्णधार मॉर्नग एक बाजू खंबीरपणे लढवत होता.  त्याने इंग्लंड संघातील सहकारी बेन स्टोक्‍सच्या एका षटकांत २४ धावांची वसुली केली हे डावातील १९ वे षटक होते. 
 

संबंधित बातम्या