कोलकात्यातील गोलरक्षक गोव्यातील संघात

किशोर पेटकर
रविवार, 26 जुलै 2020

मोहन बागानचे १४ वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर चर्चिल ब्रदर्सशी करार

पणजी

कोलकात्यातील आय-लीग विजेत्या मोहन बागान संघाचे तब्बल १४ वर्षे प्रतिनिधित्व केलेला गोलरक्षक शिल्टन पॉल आगामी मोसमात गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघातून खेळेल. या ३२ वर्षीय खेळाडूचा नवा करार एका वर्षाचा असेल.

टाटा फुटबॉल अकादमीतील प्रशिक्षण संपविल्यानंतर २००६ मध्ये शिल्टन पॉलने मोहन बागानची `ग्रीन अँड मरून` जर्सी अंगावर चढविली. मोहन बागानचे प्रतिनिधित्व करत असताना मध्यंतरी तो लोनवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत चेन्नईयीन एफसी, केरळा ब्लास्टर्स, एटीके या संघातून खेळला.

शिल्टन संघाचा कर्णधार असताना मोहन बागानने २०१४-१५ आय-लीग स्पर्धा जिंकली होती. गतमोसमातही ते आय-लीग विजेते ठरले. एटीके आणि मोहन बागानचे विलिनीकरण झाले असून ते २०२०-२१ मोसमापासून आयएसएल स्पर्धेत संयुक्त नावाने खेळतील. आगामी मोसमात चर्चिल ब्रदर्स संघ आय-लीग स्पर्धेत खेळेल.

संपादन -अवित बगळे

संबंधित बातम्या