राष्ट्रीय क्रीडादिनी कोनेरू हम्पीने उंचावली देशाची शान

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

बुद्धिबळ ऑलिंपियाड : पोलंडला हरवून भारत प्रथमच अंतिम फेरीत, आज निर्णायक लढत

मुंबई: देशात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जात असताना भारतीय बुद्धिबळ संघानेही हा दिवस अविस्मरणीय विजयाने साजरा केला. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिपियाडमध्ये पोलंडचे आव्हान निसटत्या फरकाने मोडून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. कमालीच्या प्रतिकारानंतर भारतीयांनी ही लढत बरोबरीत आणली आणि निर्णायक डावात कोनेरू हम्पीने कमाल केली.

कोनेरू हम्पी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. आपला हा लौकिक तिने कायम राखला. त्याअगोदर विश्‍वनाथन आनंद, कर्णधार विदित गुजराती यांनी लढा देत बरोबरी साधली होती. भारताची अंतिम लढत उद्या अमेरिका आणि अव्वल मानांकित रशिया यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.

पोलंडविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात पहिल्या डावात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात पोलंडला सपाटून मार दिला आणि बरोबरी साधली. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी घेण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये हम्पीने काळ्या प्याद्यांसह खेळतानाही मोनिका सोकोचा पराभव केला. 

हम्पीची काळी प्यादी असल्यामुळे तिला चार मिनिटांत चाली कराव्या लागत होत्या; तर मोकिनाला पाच मिनिटांचा कालावधी मिळत होता. एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष त्यात काळी प्यादी आणि अतिरिक्त दडपण अशी दडपणाची स्थिती असतानाही हम्पीने तेवढाच जोरदार खेळ करत ७३ व्या चालीत सामना जिंकला. भारतीयांसाठी ही लढत कसोटी पाहणारी ठरली. पहिल्याच डावात २-४ अशी हार झाली होती, पण दुसऱ्या डावात मात्र ४.५-१.५ असा विजय मिळवून बरोबरी साधली होती. या दुसऱ्या डावाची सुरुवात विश्‍वनाथान आनंदने विजयाने केली. पहिल्या डावात आनंदचा पराभव झाला होता. दुसऱ्या डावात विदित आणि हरिका यांचा पराभव झाला असला, तरी हम्पीने तिची लढत जिंकली.

भारताचे पदक निश्चित
या अगोदर २०१४ मध्ये भारताला ब्रॉझपदक मिळाले होते. आता अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित झाले आहे.

संबंधित बातम्या