''कृष्णाचं पुनरागमन चमत्कारापेक्षा कमी नव्हतं''

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

शोएब अख्तरने कृष्णाच्या दामदार कामगिरीवर स्तुतीसुमनांची उधळण केली आहे.

इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 66 धावांनी पाहुण्या इंग्लंडचा पराभव केला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध्द कृष्णाच्या गोलंदाजीचं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं तोंडभरुन कौतुक केलं आहे. कृष्णाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच 8.1 षटकात 54 धावा देऊन 4 विकेट घेतल्या आहेत. यावरुनच शोएब अख्तरने कृष्णाच्या दामदार कामगिरीवर स्तुतीसुमनांची उधळण केली आहे.

तो कृष्णा नाही तर तो करिष्मा... इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजांनी गोलंदाजीची पिसे काढल्यानंतर त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केलं ते करिष्मा (चमत्कारापेक्षा) कमी नव्हतं..  असं शोएब अख्तरने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यासोबत अख्तरने गोलंदाजी करताना चेंडूचा वेग कधीही कमी करु नको असा सल्लाही कृष्णाला दिला आहे.

IPL 2021: धोनीने नवी जर्सी लॉन्च करताच जडेजाने केली स्पेशल डिमांड 

फलंदाजांनी आक्रमण केल्यानंतर पुन्हा दमदार पुनरागमन करण्यासाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही तुमची हिंमत आणि कौशल्य दाखवणं हे खूप गरजेचं असतं. ज्याप्रकारे कृष्णाने चार विकेट घेतल्या त्याने खूपच चांगली कामगिरी केली. अशाच प्रकारे उत्तम कामगिरी करत रहा.. फक्त एकच गोष्ट सतत स्मरणात ठेव जेव्हा केव्हा फलंदाज तुझ्या गोलंदाजीवर आक्रमण करतील तेव्हा तु चेंडूचा वेग कमी करु नकोस. जेव्हा तुला गोलंदाजी करताना काही करावं असं सुचत नाही तेव्हा तुला फक्त हेच करायचं आहे, असं अख्तर म्हणाला. तो पुढे ही म्हणाला, गोलंदाजी करताना चेंडूचा वेग कधीच कमी होऊ देऊ नकोस, असा सल्लाही शोएबने प्रसिध्द कृष्णाला दिला आहे. 25 वर्षीय प्रसिध्द कृष्णाने इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

कृष्णाने सामन्याच्या उत्तरार्धात उत्तम गोलंदाजी करत इंग्लंडच्या चार महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत परत पाठवले. कृष्णाने या कामगिरीसह 24 वर्षाचा विक्रम मोडला आहे. माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड यांचा विक्रम मोडला आहे. 1997 मध्ये डेव्हीड यांनी वेस्ट इंडिज विरुध्दच्या पदार्पण सामन्यामध्ये 21 धावा देत 3 बळी घेतले होते. तर इंग्लंडविरुध्द कृष्णाने 8.1 षटकात 54 धावा 4 विकेट घेतल्या आहेत.
 

संबंधित बातम्या