कृणाल पांड्याचा पदार्पणाच्या सामन्यात विश्वविक्रम

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

कृणालने लोकेश राहुलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 61 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली.

पुणे : भारत-इंग्लंड यांच्यात पार पडत असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. कृणाल पांड्या आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर इंग्लडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणालने 26 चेंडूमधये अर्धशतक ठोकले.

कृणाल आपल्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्या डावात नाबाद राहिला. त्याने 31 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 58 धावा केल्या. खेळीदरम्यान कृणालने लोकेश राहुलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 61 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. (Krunal Pandas world record in debut match)

INDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ

कृणाल भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात अर्धशतक ठोकणारा 15 वा फलंदाज ठरला आहे. कृणालने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिस यांचा विक्रम मोडला. 1990 मध्ये मॉरिस यांनी ऑस्ट्रेलियाविरुध्द पदार्पण करताना 35 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते. सामना संपल्यानंतर कृणाल भावूक झाला होता. त्याने आपला छोटा भाऊ हार्दिक पांड्याला मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. कृणालने आपली ही अफलातून खेळी दिवंगत वडिलांना अर्पण केली.

 

सामना सुरु होण्यापूर्वी कृणाल पांड्याला हार्दीक पांड्याच्या हातून टीम इंडियाची कॅप देण्यात आली. कृणालने हार्दीकच्य़ा हातून टीम इंडियाची कॅप घेतल्यानंतर भावूक झाला होता. त्याने कॅप घेऊन आकाशाच्या दिशेने ती कॅप हलवली. जणू काही त्याने आपल्या वडिलांना टीम इंडियाची कॅप दाखवून आदरांजली वाहिली होती. यावर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये कृणालच्या वडिलांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

 

संबंधित बातम्या