२०११ क्रिकेट विश्वचषक : महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या षटकाराचा चेंडू गवसला

वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत २०११ च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतास जगज्जेते केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी वानखेडे स्टेडियम महत्त्वाचे ठरले होते, तसेच धोनीने षटकार मारलेला चेंडू, तसेच त्यावेळी चेंडू गेलेली जागाही ऐतिहासिक होती.

मुंबई: महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत २०११ च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतास जगज्जेते केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी वानखेडे स्टेडियम महत्त्वाचे ठरले होते, तसेच धोनीने षटकार मारलेला चेंडू, तसेच त्यावेळी चेंडू गेलेली जागाही ऐतिहासिक होती. आता अखेर जवळपास दहा वर्षांनी तो षटकार नेमका कुठे गेला हे कळले आहे, तसेच तो चेंडूही मिळण्याची शक्‍यता आहे.

माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या मदतीमुळेच मुंबई क्रिकेट संघटनेस हा अमूल्य ठेवा गवसणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने धोनीचा षटकार ज्या सीटवर गेला ती जागा भारताच्या जगज्जेत्या कर्णधारासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे तर त्या सीटची खास ओळखही तयार करण्याचा प्रस्ताव संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी दिला होता. अखेर तो चेंडू कोणत्या सीटवर गेला होता ते समजले आहे.

एमसीए पॅव्हेलियनच्या एल ब्लॉकमधील सीट क्रमांक २१० येथे धोनीचा षटकार गेला होता. एवढेच नव्हे तर धोनीने ज्या चेंडूवर षटकार मारला होता, तो चेंडूही आता कोणाकडे आहे हे समजले आहे. सुनील गावसकर यांच्या मित्राला याबाबत माहिती आहे.

वानखेडे पर्यटन स्थळ 
मुंबई दर्शन करणाऱ्या पर्यटकांना वानखेडेचे दर्शनही घडवण्यात यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने नुकताच मुंबई क्रिकेट संघटनेस दिला होता. भारताने विश्‍वकरंडक ज्या स्टेडियमवर उंचावला ते स्टेडियम पाहण्याची मुंबईत येणाऱ्या अनेकांची इच्छा असते. 

संबंधित बातम्या