पंजाबला आज अखेरची संधी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सलग पाच विजय मिळवून शानदार प्रगती करणाऱ्या पंजाबला राजस्थानकडून पराभवाचा धक्का बसला. आता आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची त्यांना उद्या अखेरची संधी मिळणार आहे; पण समोर चेन्नईचा अडथळा त्यांना पार करावा लागणार आहे. 

अबुधाबी : सलग पाच विजय मिळवून शानदार प्रगती करणाऱ्या पंजाबला राजस्थानकडून पराभवाचा धक्का बसला. आता आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची त्यांना उद्या अखेरची संधी मिळणार आहे; पण समोर चेन्नईचा अडथळा त्यांना पार करावा लागणार आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाचे आव्हान अगोदरच संपलेले असल्यामुळे त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. आता कोणत्याही दडपणाशिवाय खेळत असल्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोलकाताला पराभूत केले. अशीच कामगिरी उद्याही झाली, तर पंजाबच्या आशा मावळू शकतात.

चेन्नईकडून विजयी सांगता?
पंजाबबरोबर चेन्नईचाही उद्या अखेरचा साखळी सामना आहे. यंदाच्या मोसमाची विजयाने सांगता करावी, यासाठी चेन्नईचा संघ प्रयत्नशील असेल. त्यामुळे पंजाबचा धोका वाढू शकतो. कागदावर तरी पंजाबचा संघ ताकदवर आहे; परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये अशा ताकदवर संघांना प्रत्यक्ष सामन्यात तुलनेने कमजोर संघांकडून पराभव सहन करावा लागलेला आहे. 

काल झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबचे पारडे जड होते, ख्रिस गेलच्या ९९ धावांमुळे त्यांनी १८५ धावांपर्यंत मजलही मारली होती; परंतु दोन षटके शिल्लक असताना त्यांना पराभव झाला होता. त्यामुळे उद्या त्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणारआहे.

ख्रिस गेल फॉर्मात
ख्रिस गेल संघात परतल्यानंतर पंजाबने सर्व सामने जिंकलेले आहेत (अपवाद शुक्रवारच्या सामन्याचा) प्रत्येक सामन्यागणिक गेलच्या धावांचा झरा वाढत आहे. ट्‌वेन्टी-२० मध्ये १ हजार षटकारांचा विक्रम त्याने कालच्या सामन्यातून केला. उद्या संघासाठी अस्तित्वाची लढाई असल्यामुळे तो पूर्ण जोशात खेळेल; पण केएल राहुलचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साथ देणे संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

गोलंदाजीत सुधारणा हवी
गेल्या काही सामन्यात पंजाबच्या गोलंदाजीत चांगली सुधारणा झाली होती. मुंबईविरुद्धच्या टाय सामन्यात बुमरापेक्षा शमी श्रेष्ठ ठरला होता; परंतु शुक्रवारच्या सामन्यात शमी आणि कंपनीला राजस्थानच्या बेन स्टोक्‍स, संजू सॅमसन आणि स्टीव स्मिथकडून चांगलाच मार सहन करावा लागला होता. चेन्नईचे फलंदाज कशी फलंदाजी करतात हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या