लिअँडर डिकुन्हाशी एफसी गोवाचा करार

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

२२ वर्षीय खेळाडूस डेव्हलपमेंट संघातून सीनियर चमूत बढती

पणजी

एफसी गोवा संघाने आगामी फुटबॉल मोसमासाठी २२ वर्षीय राईट बॅक खेळाडू लिअँडर डिकुन्हा याच्याशी करार केला आहे. डेव्हलपमेंट संघातून सीनियर चमूत त्याला बढती मिळाली आहे.
मागील तीन वर्षांत एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून सीनियर पातळीवर संधी मिळालेला लिअँडर सातवा फुटबॉलपटू आहे. नव्या करारानुसार, लिअँडर २०२३ पर्यंत एफसी गोवा संघाचा सदस्य राहील.
एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर आनंदित झालेल्या लिअँडरने, ही फार मोठी भावना असून स्वप्नपूर्ती असल्याची प्रतिक्रिया दिली. मागील तीन वर्षे डेव्हलपमेंट संघातून खेळताना आपण खूप मेहनत घेतली, त्याचे हे फळ असल्याचे त्याने नमूद केले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनीही लिअँडरचे संघात स्वागत केले आहे. २०१७ साली संतोष करंडक स्पर्धेत खेळताना लिअँडरच्या गुणवत्तेने आम्हाला प्रभावित केले होते, तेव्हापासून आमची त्याच्यावर नजर होती, असे रवी यांनी सांगितले.
एफसी गोवा संघाच्या युवा विकास उपक्रमातून सीनियर गटात आलेल्या महंमद नवाज, सेवियर गामा, प्रिन्सटन रिबेलो, लिस्टन कुलासो, किंग्सली फर्नांडिस, शुभम धस यांच्या यादीत आता लिअँडरचा समावेश झाला आहे.

लक्षवेधक कारकीर्द
कुंकळ्ळी येथील बचावपटू लिअँडरच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरवात सेझा फुटबॉल अकादमीद्वारे झाली. त्यानंतर तो चर्चिल ब्रदर्स संघातून खेळला. तीन वर्षांपूर्वी तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल झाला. गतमोसमात तो एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचा कर्णधार होता. लिअँडर संघात असताना एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाने २०१८-१९ मोसमात गोवा प्रो-लीग स्पर्धा जिंकली. २०१९-२० मोसमात संघाने पोलिस कप पटकाविला.

संबंधित बातम्या