चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लैपझिगचा ॲटलेटिकोला हादरा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

अमेरिकेच्या टायलर ॲडम्सने दोन मिनिटे असताना निर्णायक गोल केला. गोलशून्य पूर्वार्धानंतर मोक्याूच्या वेळी भेदक आक्रमण करीत लैपझिगने बाजी मारली.

लिस्बन: स्थापनेनंतर अवघ्या अकरा वर्षांत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम आरबी लैपझिगने केला. त्यांनी जरा जास्तच सावध असलेल्या ॲटलेटिको माद्रिदचा बचाव २-१ असा भेदत आगेकूच केली. गेल्या सहा वर्षांत तीनदा अंतिम फेरी गाठलेल्या ॲटलेटिकोचे लढत जादा वेळेत नेण्याची योजना लैपझिगने उधळून लावली. 

अमेरिकेच्या टायलर ॲडम्सने दोन मिनिटे असताना निर्णायक गोल केला. गोलशून्य पूर्वार्धानंतर मोक्याूच्या वेळी भेदक आक्रमण करीत लैपझिगने बाजी मारली. जर्मनीतील लीगमध्ये लैपझिगची मदार टिमो वेर्नर याच्यावर होती. त्याने मोसमात ३४ गोल केले होते, तर त्याच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे ४४. ॲटलेटिकोच्या बचावात्मक खेळाच्या तुलनेत त्यांचा खेळ जास्तच लक्षवेधक ठरत होता. ॲटलेटिकोने पिछाडीवर पडल्यावर दिएगो कोस्टाकडे आक्रमणाची धुरा सोपवली; पण त्याला फारशी संधी मिळणार नाही, याची खबरदारी लैपझिगने घेतली. बरोबरी साधल्यानंतर ॲटलेटिको मार्गदर्शकांनी खेळाडूंना चेंडूवर ताबा ठेवण्यास जास्त प्राधान्य देण्याची सूचना केली; पण त्यांची योजना अँगेलिनोच्या अप्रतिम चालीने आणि ॲडम्स प्रभावी किकने अपयशी ठरवली. 

लक्षवेधक
-    बायर्न म्युनिच आणि बोरुसिया डॉर्टमंड सोडल्यास जर्मनीतील संघ २०१०-११ नंतर प्रथमच उपांत्य फेरीत, त्या वेळी शॅल्केकडून कामगिरी
-    ॲटलेटोकि माद्रिद चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रथमच जर्मनीतील संघाविरुद्ध पराजित. यापूर्वी बायर लिव्हरकुसेन आणि बायर्न म्युनिचविरुद्ध सरशी

-    ॲटलेटिको माद्रिदचा सलग १९ व्या सामन्यात गोल

-    चॅम्पियन्स लीगमध्ये ॲटलेटिको माद्रिदविरुद्ध स्पेनच्या खेळाडूने गोल करण्याचा प्रसंग २०१७ नंतर प्रथमच. या वेळी कामगिरी दॅनी ओल्मो याच्याकडून

-    लैपझिगचा निर्णायक गोल करणाऱ्या ॲडम्सचा संघाकडून खेळताना पहिलाच गोल. २८ व्या सामन्यात ही कामगिरी

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या