लेनी आणखी दोन वर्षे एफसी गोवा संघात

लेनी आणखी दोन वर्षे एफसी गोवा संघात
Lenny Rodrigues

पणजी

अनुभवी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज आणखी दोन वर्षे एफसी गोवा संघातर्फे खेळताना दिसेल. त्याने या संघाशी २०२२ पर्यंत करार केला आहे.

लेनी २०१८ साली एफसी गोवा संघात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने एफसी गोवा संघाच्या मध्यफळीत चमकदार खेळ करत स्थान भक्कम केले. तो संघात असताना एफसी गोवाने २०१९ मध्ये सुपर कप, तर २०१९-२० मोसमात आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकली.

‘‘माझे प्रेम आणि पाठिंबा असलेल्या क्लबकडून खेळणे, माझ्या प्रियजनांच्या जवळ राहणे आणि गोव्यातील लोकांचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी अगदी परिपूर्ण आहे,’’ असे एफसी गोवाशी आणखी दोन वर्षांसाठी करार केल्यानंतर ३३ वर्षीय लेनीने सांगितले. या संघातून खेळताना मागील दोन मोसम आपल्यासाठी शानदार ठरल्याचे त्याने नमूद केले. ‘‘आगामी मोसमासाठी मी प्रेरित आहे. तो नवा अध्याय असेल, शिवाय एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही खेळायला मिळतेय. त्याकडे मी आश्वासकपणे पाहत आहे,’’ असे लेनी म्हणाला.

एफसी गोवासाठी लेनी हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव फायदेशीर ठरतो, असे संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले. संघाचे नवे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्यासाठी लेनीचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा रवी यांनी व्यक्त केली.

बंगळूर एफसीसोबतचा करार संपल्यानंतर २०१८ साली लेनी गोव्यात परतला होता, त्यानंतर त्याने एफसी गोवा संघाची करार केला. तो संघात असताना गोव्याचा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत २०१८-१९ मोसमात उपविजेता ठरला होता. त्यात, तसेच सुपर कप विजेतेपदात लेनीची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.  गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने दोन गोल नोंदविले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com