
FC Goa : एफसी गोवा व एटीके मोहन बागान या संघांतील खेळाडूंच्या अदलाबदली प्रक्रियेनंतर ग्लेन मार्टिन्स कोलकात्याला रवाना झाला, तर लेनी रॉड्रिग्ज पुन्हा गोव्यात दाखल झाला. सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बाकी सामन्यात लेनी एफसी गोवा संघाच्या जर्सीत दिसेल.
त्याने साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर संघासोबत सराव सुरू केला आहे. लेनी याचा करार अल्पमुदतीचा असल्याचे एफसी गोवाने मंगळवारी जाहीर केले. लेनी यापूर्वी एफसी गोवातर्फे अडीच मोसम खेळला, त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये त्याची जागा ग्लेन मार्टिन्स घेतली व लेनी एटीके मोहन बागान संघात रुजू झाला.
``एफसी गोवा संघात पुन्हा येताना मला आनंद होत आहे. या संघासोबत खेळताना काही बाबी अपूर्ण राहिल्या याची जाणीव नेहमीच व्हायची. साहजिकच या संघातर्फे पुन्हा खेळण्याची संधी मिळणे अभिमानास्पद वाटते, घरच्या चाहत्यांच्या साक्षीने खेळायला मिळण्याचा आनंद होतोय,`` अशी प्रतिक्रिया लेनी याने दिली. एफसी गोवा संघाप्रमाणेच लेनीनेही आता प्ले-ऑफ फेरी पात्रतेचे ध्येय बाळगले आहे.
लेनी रॉड्रिग्ज याच्याविषयी...
मध्यफळीत खेळणारा लेनी याच्या कारकिर्दीला नागोवा येथील फ्रान्स-पॅक्स एफसीच्या युवा संघातर्फे सुरवात झाली. त्यानंतर त्याने साळगावकर एफसी, चर्चिल ब्रदर्स या संघांचेही प्रतिनिधित्व केले. चर्चिल ब्रदर्सतर्फे सहा मोसम खेळताना त्याने दोन वेळा आय-लीग, प्रत्येकी एक वेळ फेडरेशन कप व ड्युरँड कप जिंकला.
2014 साली आयएसएल स्पर्धेच्या पहिल्या मोसमात त्याला एफसी पुणे सिटीने करारबद्ध केले. नंतर तो लोनवर धेंपो क्लब, मोहन बागान, बंगळूर एफसी या संघांतर्फेही खेळला. सध्या 35 वर्षांच्या असलेल्या लेनी याच्याशी 2018 मध्ये एफसी गोवाने करार केला. या संघातर्फे त्याने सुपर कप, आयएसएल लीग विनर्स शिल्ड पटकावण्याचा मान मिळविला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारतातर्फे खेळलेल्या लेनीपाशी सुमारे 300 सामन्यांचा अनुभव आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.