गोव्यात क्रीडा सक्रियतेची शक्यता कमी

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

‘‘सरावाच्या वेळेस समाज अंतराचे भान राखावेच लागेल. शारीरिक संपर्क येणाऱ्या खेळांबाबत हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे स्पष्ट दिशानिर्देश येईपर्यंत थांबावे लागेल,’’ असे भक्ता म्हणाले.

 

पणजी,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊन ४.० मध्ये स्टेडियम आणि क्रीडा संकुले उघडता येतील, मात्र प्रेक्षकांना परवानगी नसेल असे केंद्र सरकारने जाहीर केले असले, तरी सद्यःस्थितीत गोव्यात लगेच क्रीडा स्पर्धा सक्रियतेची शक्यता खूपच कमी आहे. शारीरिक संपर्क येणाऱ्या खेळांबाबत सावधानता बाळगावी लागेल, तसेच कोविड-१९ विषयक वापरात असल्याने प्रमुख स्टेडियम सध्या अनुपलब्ध आहेत.
सराव करताना किंवा खेळताना शारीरिक संपर्क येणाऱ्या खेळांबाबत सावधानता बाळगावीच लागते, त्यामुळे लगेच या खेळांचा सराव शक्य नाही, असे गोवा ज्युडो संघटनेचे पदाधिकारी गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. ते गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिवही आहेत. ‘‘सरावाच्या वेळेस समाज अंतराचे भान राखावेच लागेल. शारीरिक संपर्क येणाऱ्या खेळांबाबत हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे स्पष्ट दिशानिर्देश येईपर्यंत थांबावे लागेल,’’ असे भक्ता म्हणाले.

स्टेडियमचे निर्जंतुकीकरण हवे
गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सध्या गोव्यात प्रमुख स्टेडियम अनुपलब्ध आहेत याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘गोव्यातील क्रीडा उपक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. प्रमुख स्टेडियम सध्या कोविड-१९ चे विलगीकरण केंद्र बनले आहेत किंवा इतर संबंधित बाबींसाठी वापरले जात आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काही काळ लागेल.’’ हेबळे यांच्या मते, पणजीतील क्रीडा सुविधा सक्रिय होतील, पण म्हापसा, फातोर्डा, नावेली येथील क्रीडा संकुलाचा वापर कोविड-१९ संदर्भात विविध कारणांसाठी होत आहे. तेथील वास्तू लगेच वापरात आणणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसेल.

क्रिकेटला प्रवासाची चिंता
स्टेडियम आणि क्रीडा संकुले उघडता येतील, मात्र प्रेक्षकांना परवानगी नसेल या दिशानिर्देशाचा अर्थ बंद दरवाज्याआड सामने घेता येईल असा होतो. कोराना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे गोव्यातील बऱ्याच क्रिकेट स्पर्धा अपूर्ण आहेत, त्या सुरू केल्या जातील का अशी विचारणा गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) केली असता, ‘‘केंद्र सरकारने लॉकडाऊन ४.० बाबत दिशानिर्देश दिले असले, तरी त्यात अजूनही स्पष्टता आवश्यक आहे. साऱ्या बाबी स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही सामने घेण्याचा विचार करू, पण ती शक्यता खूपच कमी आहे. सामन्यासाठी संघांना मैदानापर्यंत जाण्यासाठी प्रवास करावा लागेल, आमच्यासाठी हीच मोठी चिंता आहे. प्रवासात समाज अंतर राखण्याबाबत खूपच गांभीर्याने राहावे लागेल. दोन्ही संघांतील खेळाडू, पंच, सामनाधिकारी, स्कोअरर, सपोर्ट स्टाफ, मैदानाचे कामगार या साऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी लागेल. सध्यातरी आम्हाला धोका पत्करायचा नाही,’’ असे जीसीएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

बॅडमिंटन संघटना सज्ज
लॉकडाऊन ४.० कालावधीत शिथिलता आल्यामुळे पुन्हा सराव सत्रास सुरवात करण्यासाठी गोवा बॅडमिंटन संघटना सज्ज असल्याचे संदीप हेबळे यांनी सांगितले. बॅडमिंटन हा शारीरिक संपर्क न येणारा खेळ आहे. ‘‘या संदर्भात आम्हाला सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर लगेच आम्ही सरावास सुरवात करणार आहोत, आम्ही पूर्णपणे तयार आहोत,’’ असे गोवा बॅडमिंटन संघटनेच्या सचिवांनी सांगितले.

संबंधित बातम्या