मेस्सीचा बार्सिलोना निरोप कायद्याच्या कचाट्यात?

.
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्‍लब सोडण्याचा निर्णय अधिकृतपणे कळवला आहे; मात्र आता त्याच्या पत्रामुळे यात कायदेशीर प्रश्न येण्याची शक्‍यता आहे. मेस्सीला नव्याने करारबद्ध करणाऱ्या क्‍लबकडून बार्सिलोना ७० कोटी युरो मागण्याची शक्‍यता आहे. 

बार्सिलोना: लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्‍लब सोडण्याचा निर्णय अधिकृतपणे कळवला आहे; मात्र आता त्याच्या पत्रामुळे यात कायदेशीर प्रश्न येण्याची शक्‍यता आहे. मेस्सीला नव्याने करारबद्ध करणाऱ्या क्‍लबकडून बार्सिलोना ७० कोटी युरो मागण्याची शक्‍यता आहे. 

मेस्सीने काही वर्षांपूर्वी नव्याने करार करताना बार्सिलोनास काहीही रक्कम न देता मुक्त होण्याची अट घातली होती. आत्ताही त्याच्या वकिलांनी क्‍लबला पाठवलेल्या पत्रात दोघांनी परस्परांच्या सहमतीने करार रद्द करावा, असे म्हंटले आहे. बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील संबंध या वर्षात खूपच बिघडले. त्यातच बार्सिलोनास चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिचविरुद्ध २-८ पराभव पत्करावा लागल्याने मेस्सीने निरोप घेण्याचे ठरवले. मेस्सी बार्सिलोनाच्या व्यवस्थापनावर नाराज होता. त्याने क्‍लबचा निरोप घेण्याचे ठरवल्याने शेकडो चाहत्यांनी क्‍लबच्या मुख्यालयासमोर अध्यक्ष बार्तोमेऊ यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

प्रसंगी शुल्क भरण्याची तयारी
मेस्सी कोणत्याही परिस्थितीत बार्सिलोनाबरोबर राहण्यास तयार नाही. काही वर्षांपूर्वी त्याने हा विचार केला होता, त्या वेळी त्याला संघनिवडीत जास्त अधिकार हवे होते. आता फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक ट्रान्स्फर शुल्क देण्याची त्याची तयारी आहे. त्यामुळे प्रसंगी त्याच्या मानधनावरही याचा परिणाम होऊ शकेल. मेस्सीने काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक कोएमन यांना क्‍लब सोडण्याचा विचार करीत आहोत, हे सांगितले होते. त्याबाबत कोएमन तसेच आपण मौन बाळगूनही बातमी लीक कशी झाली. यामुळेही मेस्सी संतप्त झाला आहे. 

मेस्सी आणि बार्सिलोना

  •  अर्जेंटिनातील नेवेल ओल्ड बॉईज संघातून १३ वर्षांचा असताना बार्सिलोनाकडे (२०००)
  •  बार्सिलोनाकडून खेळताना ७३१ लढतीत ६३४ गोल
  •  बार्सिलोनाच्या एकंदर ३४ प्रमुख विजेतेपदात मोलाचा वाटा
  •  दहा वेळा ला लिगा विजेते, तर चार वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली
  •  ला लिगामध्ये सर्वाधिक ४४४ गोलचा विक्रम
  •  बॅलॉन डी ओर तसेच सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्याचा पराक्रम प्रत्येकी सहा वेळा 
  •  २०१२ मध्ये ७९ गोल करण्याचा पराक्रम
  •  सलग दहा मोसमात किमान चाळीस गोल करणारा एकमेव खेळाडू
  •  चॅम्पियन्स लीगमध्ये एकाच क्‍लबकडून खेळताना सर्वाधिक ११५ गोल करण्याचा पराक्रम

संबंधित बातम्या