...तर लिओनेल मेस्सी मुंबई सिटीकडूनही खेळणार?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

मेस्सीने बार्सिलोनाला आपण निरोप घेत असल्याचे कळवल्यावर इंडियन सुपर लीगमधील केरळा ब्लास्टर्स आणि आय लीगमधील गोकुळम केरळा यांनी आपल्या संघाच्या पोषाखात मेस्सीचे ट्‌विट केले.

नवी दिल्ली: लिओनेल मेस्सीने बार्सिलोना सोडण्याचे पत्र दिल्यापासून तो भविष्यात कोणत्या क्‍लबकडून खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. मेस्सीची पसंती, तसेच त्याच्याबरोबर होणारे करार लक्षात घेतल्यास भविष्यात तो मुंबई सिटीकडूनही खेळण्याची शक्‍यता आहे.

मेस्सीने बार्सिलोनाला आपण निरोप घेत असल्याचे कळवल्यावर इंडियन सुपर लीगमधील केरळा ब्लास्टर्स आणि आय लीगमधील गोकुळम केरळा यांनी आपल्या संघाच्या पोषाखात मेस्सीचे ट्‌विट केले. त्यास काही चाहत्यांनी दोन्हीकडून खेळू शकतो, असे सुचवले. आता हे जवळपास अशक्‍य आहे, पण मेस्सी मुंबई सिटीकडून भविष्यात खेळण्याची शक्‍यता पूर्ण नाकारता येत नसल्याचे वृत्त आहे. 

 

 

प्रीमियर लीगमधील ताकदवान संघ मॅंचेस्टर सिटी मेस्सीला करारबद्ध करण्यासाठी जास्त उत्सुक आहेत. हा करार दीर्घकालीन असेल. तीन वर्षांनंतर मेस्सी सिटीच्या सहकारी क्‍लबकडून खेळू शकतो. मॅंचेस्टर सिटीची मालकी सिटी फुटबॉल ग्रुपकडे आहे. याशिवाय त्यांचे न्यूयॉर्क सिटी एफसी, योकोहामा एफ, मारिनोस यांसाररख्या एकंदर आठ क्‍लबमध्ये महत्त्वाची भागीदारी आहे. 

गतवर्षी सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसी क्‍लबमधील ६५ टक्के सहभाग असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मेस्सीसाठी मुंबई सिटी एफसी संघातून खेळण्याचा पर्यायही खुला असू शकतो. सिटीकडून तीन मोसमात खेळल्यानंतर मेस्सी त्यानंतर एमएलएसला पसंती देईल. त्यानंतरच्या मोसमात तो कधीही मुंबई सिटीची निवड करू शकतो, असे सांगितले जात आहे. अर्थात हे सर्व मेस्सी बार्सिलोनातून सिटीकडे गेल्यासच शक्‍य आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या