अॅडिलेड- भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस आघाडी घेऊन खेळत होता. आजच्या दिवसाच्या सुरूवात झाली आणि भारत अचानक बॅकफूटला कधी गेला हे कोणालाही कळले नाही. कसोटी क्रिकेटमधील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय फलदाजांना फलंदाजी करताना आज दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकाच सेशनमध्ये अशी काही गोलंदाजी केली की जिंकण्याच्या मूडमध्ये असणाऱ्या भारतीय संघाला हारण्याच्या दारात नेऊन ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने सर्वाधिक पाच गडी बाद करत भारतीय संघाचे कंबरडेच मोडले. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारत बॅकफूटवर गेल्याने पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघावर दबाव वाढणार आहे.
भारतीय संघ- विराट कोहली(कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा, रविश्चंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ- टीम पेन(कर्णधार), जो बर्न्स, मॅथ्यु वेड, मार्कस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरून ग्रीन, ट्रेविस हेड, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लायन,
ठिकाण- अॅडिलेड ओव्हल
ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून केला पराभव
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून भारताचा पराभव केला आहे. फक्त ९० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून बर्न्सने ५१ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहचवले.
ऑस्ट्रेलिया विजयापासून ३ धावा दूर
विजयापासून केवळ तीन धावा दूर असणाऱ्या ऑस्ट्र्रेलियाने तीनच दिवसांत सामना निकाली काढला आहे.
ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट
लबुशेनने मयंक अगरवालकडे झेल दिला आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर त्याने चुकीचा फटका खेळल्यानंतर त्याला आपली विकेट गमवावी लागली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद, धावसंख्या 70/1
वेड धावबाद झाला असून ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला आहे. मात्र, सामना ऑस्ट्रेलियाने जिंकण्यातच जमा आहे. जिंकण्यासाठी काहीच धावांची गरज आहे.
डिनरनंतर खेळाला सुरूवात
ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक क्रिकेट खेळत असून त्यांनी एकदिवसीय सामन्यासारखी धावगती राखली आहे. बर्न्स आणि वेड यांनी भारतीय फलंदाजांवर तुटून पडत लवकरात लवकर सामना संपवण्याच्या मूडमध्ये आहेत.
डिनरब्रेक झाला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २५/0
ऑस्ट्रेलियाने ९० धावांचा पाठलाग करताना आक्रमक खेळाला सुरूवात केली आहे.
ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी मैदानावर
सलामीवीर मॅथ्यू वेड आणि रॉरी बर्न्स डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत.
भारताची कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या
याआधी भारतीय संघ ४२ धावांमध्ये ऑलआउट झाला होता. भारताची हा डाव अतिशय कमकुवत फलंदाजीने य़ुक्त होता.
३६ धावांत भारतीय संघ ऑलआउट
फक्त ३६ धावांमध्य़े भारतीय संघ तंबूत परतला आहे. शमीच्या मनगटाला दुखापत झाल्याने तो फलंदाजी करू शकला नाही.
भारताची नववा गडीही बाद
३० धावांमध्ये भारताचे ९ गडी तंबूत परतले आहेत. हेजलवूडने ५ विकेट घेतल्या असून भारतीय फलंदाजीचे कंबरडेच मोडले.
भारताची सातवी विकेटही गेली
अश्विनही शुन्यावर बाद झाला आहे. त्याला हेजलवूडने बाद केले आहे. भारताची धावसंख्या अतिशय निराशाजनक झाली असून २६ धावांवर ७ गडी गमावले आहेत.
विराट कोहली आउट, भारताचे १९ धावांत ६ गडी बाद
विराट कोहली फक्त ४ धावा करून माघारी परतला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी असे काही केले आहे की, ते क्रिकेटमध्ये सहसा बघायला मिळत नाही.
ओह..भारताला परत एक झटका रहाणे शुन्यावर बाद
रहाणेला हेजलवूडने बाद केले. भारत संकटात सापडला असून संघाचे पाच फलंदाज तंबूत परतले आहेत.
भारताला अडचणींमध्ये वाढ, १५/४
मयंक अगरवालला हेजलवूडने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद केले आहे.
भारतीय संघाला मोठा झटका
पुजारा शुन्यावर आउट झाला आहे. कमिंलच्या अप्रतिम चेंडूवर तो बाद झाला. आता मयंक अगरवाल सोबत मैदानात असेल कर्णधार कोहली.
दिवसाच्या सुरूवातीलाच भारताला दुसरा झटका
४ षटकांच्या खेळात भारताने आपल्या नाईट वॉचमनला गमावले आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीला खेळणार आहे भारताचा नाईट वॉचमन जसप्रीत बुमराह. त्याच्याबरोबर मैदानावर आहे मयंक अगरवाल.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला भारत ९/१
दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला असून मयंक अगरवाल ५ धावा करून तर बुमराह शुन्यावर नाबाद आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह
बुमराहला नाईट वॉचमनच्या रूपात फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आहे. काहीच षटकांचा खेळ शिल्लक असल्याने त्याला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आहे.
भारताला पहिला धक्का, पृथ्वी शॉ बाद
पृथ्वी शॉ पॅट कमिंसच्या गोलंदाजींवर क्लीन बोल्ड झाला आहे. पहिल्या डावातही शॉ शुन्यावर बाद झाला होता.
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरूवात
मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांनी भारतीय डावाची सुरूवात केली आहे. ५३ धावांची आघाडी असल्याने भारतासाठी समाधानकारक बाब
भारत 10 षटके करणार फलंदाजी
भारताकडून सर्वाधिक ४ गडी बाद करणाऱ्या अश्विनने भारताला आघाडी मिळवून दिली आहे. उमेश य़ादवनेही 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलिया १९१वर ऑलआउट
उमेश यादवने हेजलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला. कर्णधार टिम पेन याने एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला तो संघाला वाचवू शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचा नववा गडी बाद
नॅथन लायनला बाद करत अश्विनने आपला चौथा बळीही मिळवला आहे. भारत अजूनही ७७ धावा पुढे आहे.
टिम पेनचे अर्धशतक
पडझड झाली असतानाही एक बाजू लावून धरणाऱ्या पेनने कर्णधाराला साजेशी कामगिरी केली असून आपले अर्धशतक पूर्ण करून तो नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाला आठवा झटका
मिशेल स्टार्क धावबाद झाला. दुसरी धाव घेण्याच्या नादात त्याला पृथ्वी शॉने बाद केले.
वृद्धीमान साहाकडून झेल सुटला
बराच वेळ हवेत असणाऱ्या चेंडूला पकडण्यात साहाला साहाला अपयश आले.
बापरे एकाच षटकात 2 विकेट
उमेश यादवही अचानक लयीत आला असून त्याने एकामागून एक दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. पॅट कमिंसला त्याने खाते न उघडू देता बाद केले.
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद
लबुशेनच्या रूपात ऑस्ट्रेलियाला सहावा झटका लागला आहे. त्याने 47 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
कर्णधार टिम पेनच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला आपली धावसंख्या तीन अंकी करता आली. मात्र, ऑस्ट्रेलियाला अजून पुढे बराच पल्ला गाठावा लागणार आहे.
दुसरे सत्र अश्विनच्या नावावर
अश्विनने ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के देत त्यांचे कंबरडे मोडले.
लबुशेनला दिलेले जीवनदान महागात पडेल?
बुमराहने लबुशेनला टाकलेल्या चेंडूवर पृथ्वी शॉने त्याचा झेल सोडला. २१ धावांवर मिळालेल्या जीवदानानंतर लबुशेन हा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
भारताची सामन्यावर मजबूत पकड
पहिलाच सामना खेळणाऱ्या कॅमेरून ग्रीनला अश्विनने बाद केले. ११ धावांवर असताना त्याला कोहलीकरवी बाद केले.
अश्विनच्या फिरकीत फसले फलंदाज
६५ धावांवरच ऑस्ट्रेलियाचा ४था गडी बाद झाला. अश्विनने परत एकदा संघाच्या मदतीला धावून येत महत्वाची विकेट घेतली आहे. कसोटीमध्ये अतिशय घातक मानल्या जाणाऱ्या लबुशेनला त्याने फक्त ७ धावांवर असताना बाद केले.
मध्यांतरानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाद झाला आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल देऊन तो बाद झाला. त्याला फक्त एकच धाव करता आली.
डिनरब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या २ गडी बाद ३५ धावा
ऑस्ट्रेलियाने २ गडी बाद ३५ धावा केल्या असून स्टीव्ह स्मिथ आणि लबुशेन मैदानावर खेळत आहेत.
जो बर्न्सही बुमराहचा बळी ऑस्ट्रेलिया 35/2
जो पायचित झाला. बुमराहच्या आत येणाऱ्य़ा चेंडूवर तो चुकला आणि बाद झाला.
बुमराहने दिला ऑस्ट्रेलियाला पहिला झटका
भारताचा सुपरस्टार गोलंदाज बुमराहने संघाला चांगली सुरूवात करून देत पहिला बळी मिळवून दिला. त्याने मॅथ्यू वेड ला तंबूत पाठवले.
१२ षटकांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद १४
मॅथ्यू वेड आणि रॉरी बर्न्स यांनी सावध सुरूवात केली आहे.
भारताचा डाव २४४ धावांत आटोपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने खराब सुरूवात करत फक्त २५ धावांमध्ये आपले आघाडीचे फलंदाज गमावले. यानंतर डावाला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोहली आणि पुजारा यांनी काही काळ मैदानावर तग धरला. मात्र, त्यांनाही मौठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले.
साहाचा फ्लॉप शो कायम
भारताला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाने पुन्हा एकदा निराश करत केवळ ९ धावांमध्ये आपली विकेट गमावली. स्टार्कने भारताला ८वा झटका देत अप्रतिम गोलंदाचीचे प्रदर्शन केले आहे.
अश्विन १५ धावा करून बाद
पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर अश्विनने आपली विकेट गमावत टीम पेनजवळ कॅच देऊन तो परतला.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
पहिल्या दिवसअखेर २३३ इतकी समाधानकारक धावसंख्या उभारल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अश्विन आणि साहा मैदानावर उतरले आहेत.
पहिल्या दिवस अखेर भारत 233/6
यजमान भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर 6 बळींच्या मोबदल्यात 233 धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहा 9 धावा तर अश्विन 15 धावा करून नाबाद आहेत.
हनुमा विहारी आऊट, भारताची सहावी विकेट
भारतीय संघाला मोठा झटका २०६ धावसंख्या असताना हनुमा विहारी बाद झाला आहे. त्याला जोश हेजलवूडने बाद केले. विहारीला केवळ २ चौकार लगावता आले.
कोहलीनंतर आता अजिंक्य रहाणे बाद
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 42 धावांवर बाद झाला आहे. मिशेल स्टार्कच्या अप्रतिम माऱ्यावर त्याला परतावे लागले आहे. त्याने 3 चौकार तसेच 1 षटकार लगावला.
कोहली रनआऊट? भारताला धक्का
भारताची चौथी विकेट गेली आहे. संघाची १८८ धावसंख्या असताना विराट कोहली घाई करण्यात रनआऊट झाला आहे. त्याने सर्वाधिक ७४ धावा करताना ८ चौकार फटकारले. नवीन फलंदाज कोण येतोय? हनुमा विहारी...
कर्णधार कोहलीचे अर्धशतक
भारतीय संघाच्या कर्णधाराने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने डावाच्या 61व्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर एक धाव काढताना आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीची हे २३वे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने प्रेक्षकांना अभिवादन केले.
टी- ब्रेक भारत १०७/3
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंतर चांगली धावसंख्या उभारली असून कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाला पडझडीपासून वाचवले आहे. विराट कोहली ३९ तर अजिंक्य रहाणे २ धावा करून मैदानावर आहेत.
पुजारा ४३ धावा काढून बाद
भारतीय डावाची भिंत असलेला चेतेश्वर पुजारा 43 धावा काढून बाद झाला. त्याला नॅथन लायनने बाद केले. मैदानी पंचाने नॉट आऊट दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतला. यात तो बाद असल्याचे समजले. पुजाराने 160 चेंडू खेळताना 43 धावा केल्या यात 2 चौकारांचा समावेश आहे. पुजारा आणि कोहली यांनी ६८ धावांची भागीदारी नोंदवली.
भारताच्या १०० धावा पूर्ण
भारताने १०० धावा पूर्ण केल्या असून यासाठी ५०वे षटक यावे लागले. विराट कोहली ३४ तर पुजारा ४३ धावा करून मैदानावर खेळत आहेत.
भारताच्या ५० धावा पूर्ण
भारतीय संघाने ५० धावांचा टप्पा गाठला असून ३० षटकांच्या खेळानंतर भारताच्या इतक्या धावा झाल्या आहेत. मात्र, पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल लवकर परतल्याने भारताला दोन मोठे झटके लागले आहेत.
डिनर ब्रेक भारताची धावसंख्या ४१/२
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना डिनर ब्रेकपर्यंत २५ ओव्हरमध्ये २ विकेटच्या मोबदल्यात ४१ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 17 आणि विराट कोहली 5 धावा करून नाबाद आहेत.
मयंक अगरवाल बाद, भारताला दुसरा झटका
मयंक अगरवाल 17 धावा काढून बाद झाला आहे. लयीत दिसत असताना पॅट कमिंन्सच्या अप्रतिम चेंडूवर तो बाद झाला. त्याने 40 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावत या धावा केल्या. 32 धावांवर भारताला दुसरा झटका लागला आहे.
10 षटकांच्या खेळानंतर भारत 21/1
भारताने 10 षटकांच्या खेळानंतर 21 धावा केल्या असून मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा १० धावा करून खेळत आहेत.
दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ बाद
पृथ्वी शॉ याला मिशेल स्टार्कने परत पाठवले असून दुसऱ्याच चेंडूवर त्याला बोल्ड केले आहे. पृथ्वी भोपळाही फोडू
शकला नाही.
मयंक आणि पृथ्वी करताहेत डावाची सुरूवात
भारताकडून मयंक आणि पृथ्वी शॉ डावाची सुरूवात करत असून ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क पहिले षटकासाठी तयार झाला आहे.