एफसी गोवाची नजर पूर्ण तीन गुणांवर

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

आज बुधवारी  होणाऱ्या सामन्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास गोव्यातील संघाचे मार्गदर्शक ज्युआन फेरॅन्डो तयार नाहीत. लढत सर्वसामान्य असेल आणि आमची नजर पूर्ण तीन गुणांवर असल्याचे त्यांनी नमूद केले.

पणजी : एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा आणि काही खेळाडू आता मुंबई सिटी एफसी संघात आहेत, त्यामुळे या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आज बुधवारी  होणाऱ्या सामन्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास गोव्यातील संघाचे मार्गदर्शक ज्युआन फेरॅन्डो तयार नाहीत. लढत सर्वसामान्य असेल आणि आमची नजर पूर्ण तीन गुणांवर असल्याचे त्यांनी नमूद केले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे फुटबॉलप्रेमींची लक्ष आहे. एफसी गोवा संघाला लोबेरा यांची व्यूहरचना परिचित आहे, तर लोबेरा यांना आपल्या जुन्या संघातील काही खेळाडूंची शैली पुरेपूर ठावूक आहे. साहजिकच लढत उत्कंठावर्धक ठरण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक पासवर भर देणारी दोन्ही संघांची शैली लक्षात घेता, फातोर्ड्यात जास्त गोल होण्याचे संकेत आहेत.

फेरॅन्डो यांनी मंगळवारी सांगितले, की ``सध्या मी 90 टक्के लक्ष केवळ माझ्या संघावर केंद्रित केले आहे. आम्ही प्रतिस्पर्ध्यांचा विचार करत नाही. मागील सामन्यात संघाने केलेल्या कामगिरीने समाधानी आहे. प्रत्येकवेळी एक सामना हे लक्ष्य कायम असून सकारात्मक दृष्टिकोनासह पूर्ण तीन गुण मिळविण्याचे उद्दिष्ट्य आहे.``

मागील लढतीत स्पॅनिश स्ट्रायकर इगोर आंगुलो याने उत्तरार्धात नोंदविलेल्या दोन गोलांमुळे एफसी गोवाने दोन गोलांच्या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. फातोर्डा येथे झालेल्या लढतीत त्यांनी बंगळूरला २-२ असे गोलबरोबरीत रोखले. अलेक्झांडर रोमारियो, ब्रँडन फर्नांडिस व आल्बर्टो नोगेरा हे बदली खेळाडू उत्तरार्धात मैदानावर आल्यानंतर एफसी गोवाचा खेळ खुलला होता. ब्रँडनला उशिरा खेळविण्याविषयी फेरॅन्डो म्हणाले, की ``सध्या ब्रँडन संघासाठी आणि स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे. तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तब्बल सात महिन्यानंतर खेळाडू मैदानात उतरले असल्याने तंदुरुस्ती निर्णायक ठरते.``

मुंबई सिटीस प्रगती आवश्यक : लोबेरा

अनुभवी आणि सफल खेळाडूंचा भरणा असूनही लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीस मागील लढतीत सूर गवसला नाही. हुकमी मध्यरक्षक मोरोक्कोचा अहमद जाहू याला मिळालेल्या रेड कार्डनंतर मुंबई सिटीला एक खेळाडू कमी झाल्याचा फटका बसला होता. पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडकडून 1-0 फरकाने पराभव स्वीकारावा लागला. निलंबनामुळे बुधवारच्या लढतीस जाहू अनुपलब्ध असेल. ``माझ्यापाशी चांगले खेळाडू आहेत आणि त्यापैकी काही जणांना मुकावे लागत असल्याने प्रशिक्षक या नात्याने घाबरलेलो नाही,`` असे लोबेरा जाहूच्या अनुपस्थितीविषयी लोबेरा विश्वासाने म्हणाले. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या पराभवानंतरही ते साफ निराश नाहीत. ``सामन्यात आमचे जास्त पासेस होते. फारुख चौधरी आणि सार्थक गोलुई यांचे प्रयत्न थोडक्यात हुकले. आमच्या काही चांगल्या गोष्टी केल्या. महत्त्वाचे म्हणजे दहा खेळाडूंसह खेळूनही आम्ही सामन्यावर वर्चस्व राखले, फक्त आणखी प्रगती आवश्यक आहे,`` असे लोबेरा म्हणाले.

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात 14 लढती

- एफसी गोवाचे 7, तर मुंबई सिटीचे 4 विजय, 3 सामने बरोबरीत

- एफसी गोवाचे 33, तर मुंबई सिटीचे 14 गोल

- गतमोसमातील दोन्ही लढतीत एफसी गोवा विजयी, मुंबई येथे 4-2, तर फातोर्डा येथे 5-2 फरकाने सरशी

- एफसी गोवाचा मुंबई सिटीवर 17 नोव्हेंबर 2015 रोजी 7-0 फरकाने मोठा विजय

- यंदाच्या आयएसएलमधील मागील लढतीत मुंबई सिटीचे 451, तर एफसी गोवाचे 448 पासेस

आणखी वाचा:

संबंधित बातम्या