मुंबईचा सूर्य तळपला..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुनही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादवने निवड समितीलाही चांगलीच चपराक देताना झंझावाती नाबाद ७५ धांवांची (१० चौकार, ३ षटकार) खेळी साकार केली.

अबुधाबी : आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुनही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादवने निवड समितीलाही चांगलीच चपराक देताना झंझावाती नाबाद ७५ धांवांची (१० चौकार, ३ षटकार) खेळी साकार केली त्यामुळे मुंबईने विराट कोहलीच्या बंगळूर संघाचा पाच विकेटने पराभव केला आणि प्लेऑफ जवळपास निश्‍चित केले.

बुमाराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने बंगळूरला १६४ धावांवर रोखले. त्यानंतर हे आव्हान पाच चेंडू राखून पार केले. सूर्यकुमारने एकहाती हा विजय मिळवून दिला. सलामीवीर डिकॉक आणि इशान किशन बाद झाल्यावर सूर्यकुमारने स्वीप, पूल, कट आणि कव्हरड्राईवचे देखणे फटके मारुन पारणे फडले. निवड समितीलाही आपली चूक मान्य करायला लावणारी टोलेबाजी त्याने केली. 

खेळपट्टीवर हिरवे गवत असल्यामुळे मुंबईचे वेगवान गोलंदाज नव्या चेंडूवर वर्चस्व राखतील अशी शक्‍यता होती, परंतु बंगळूरचे सलामीवीर फिलिप आणि देवदक्क पदिक्कल यांनी जोरदार हल्ला करत दहा धावांच्या सरासरीने ७१ धावांची सलामी दिली. मुंबईला पहिले यश राहुल चहरने मिळवून दिले. त्याने फिलपला बाद केले त्यानंतर बुमराने विराट कोहलीचा प्रमुख अडसर दूर केला. विशेष म्हणजे आज डिव्हिल्यर्सचेही नाणे वाजले नाही पोलार्डने त्याला बाद केले. त्यानंतर बंगळूर संघाची घसरण सुरू झाली धावांच्या गतीलाही ब्रेक लागले. एक बाजू सांभाळणाऱ्या पदिक्कलला उसळत्या चेंडूवर बुमराने माघारी धाडले.
 

संबंधित बातम्या