महेंद्रसिंग धोनीचा नेमबाजीचा सराव

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

धोनी यापूर्वीच भारतीय नेमबाजी संघटनेचा तहहयात सदस्य झाला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्यासाठी मागवलेली रायफल वॉल्थरची होती. याच कंपनीची रायफल घेऊन अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

नवी दिल्ली: एअर रायफल मागवण्यासाठीचा ई-मेल मध्यरात्री दोन वाजता महेंद्रसिंग धोनीने पाठवला होता. ही रायफल मिळाल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन रेंजवरच सराव सुरू केला होता. त्याने सुरुवातीच्या काही प्रयत्नात लक्ष्यवेध केला होता, त्यामुळे तो आता नेमबाजीकडे वळण्याची शक्‍यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

धोनी यापूर्वीच भारतीय नेमबाजी संघटनेचा तहहयात सदस्य झाला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्यासाठी मागवलेली रायफल वॉल्थरची होती. याच कंपनीची रायफल घेऊन अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 

काही वर्षांपूर्वी मला मध्यरात्री दोन वाजता ई-मेल आला. त्यात रायफल आयात करण्यासाठी काय गोष्टी आवश्‍यक आहेत, ही विचारणा करण्यात आली होती. मी पूर्ण नाव आणि पत्ता विचारणारा ई-मेल पाठवला होता. त्यावर लगेचच उत्तर आल्यावर महेंद्रसिंग धोनीला रायफल हवी आहे, हे मला कळले होते, अशी आठवण माजी राष्ट्रीय नेमबाज शिमॉन शरीफ सांगतात. देशातील अनेक आघाडीच्या नेमबाजांसाठी शरीफ यांनी रायफल, पिस्तूल आयात केले आहे. 

धोनी हा चांगला नेमबाज आहे, असे मानवादित्य सिंग राठोडने नुकतेच सांगितले आहे. त्याने धोनी आपल्या घरी आला होता, त्यावेळी नेमबाजीबाबत खूप काही जाणून घेतले होते. रायफल खरेदी केल्यापासून तो अनेक गोष्टी विचारत होता. मी त्याला नेमबाजी सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्याने सध्या क्रिकेटमध्ये खूप व्यग्र असल्याचे सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले. 

धोनीने अनेकदा त्याचे नेमबाजीतील कौशल्य दाखवले आहे. तीन वर्षांपूर्वी कोलकत्त्यात भारतीय संघाचा सराव पावसामुळे रद्द झाल्यावर धोनी कोलकता पोलिस ट्रेनिंग स्कूलमधील शूटिग रेंजवर गेला होता. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या