गोव्याचा मंदार झाला मुंबईकर!

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

मंदार राव देसाईने सहा मोसम एफसी गोवा संघाचे सर्व स्पर्धांत मिळून १०० सामन्यांत प्रतिनिधित्व केले, आता गोव्यातील अनुभवी फुटबॉलपटू मुंबई सिटी एफसीकडून खेळणार आहे.

पणजी : मंदार राव देसाईने सहा मोसम एफसी गोवा संघाचे सर्व स्पर्धांत मिळून १०० सामन्यांत प्रतिनिधित्व केले, आता गोव्यातील अनुभवी फुटबॉलपटू मुंबई सिटी एफसीकडून खेळणार आहे. या संघाने त्याच्या दोन वर्षांच्या करारावर बुधवारी शिक्कामोर्तब केले.

मंदार झाला मुंबईकर अशी घोषणा करत मुंबई सिटीने अधिकृत कराराची माहिती दिली. भविष्यात करार वाढविण्याचा पर्यायही २८ वर्षीय फुटबॉलपटूसमोर असेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक स्पेनचे सर्जिओ लोबेरा यांच्या करारावर शिक्कामोर्तब केले होते. 

मंदारने सहा मोसमात इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत एफसी गोवाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या संघाने लीग शिल्ड पटकाविली, तसेच सुपर कपही पटकावला होता. एफसी गोवातर्फे १०० सामने खेळताना त्याने सहा गोल व ११ असिस्टची नोंद केली. या लेफ्ट-बॅक खेळाडूने २०१९ साली भारताच्या सीनियर संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तो आतापर्यंत पाच सामने खेळला आहे.

`‘मुंबई सिटी एफसीसारख्या मोठ्या क्लबमध्ये रुजू होताना मी आनंदित आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षे मुंबई सिटीसाठी प्रतिबद्ध असतील. मुंबई सिटीचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे, त्यामुळे निर्णय घेणे सोपे ठरले. माझ्या नव्या रंगात मुख्य प्रशिक्षक लोबेरा यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची संधी लाभत आहे. आमच्यासाठी आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी वर्ष यशस्वी ठरेल याची आशा बाळगतो,’’ असे मंदारने सांगितले. ‘‘मुंबई सिटी संघाची आम्ही बांधणी करत आहोत, त्यात मंदारच्या कुवतीचा खेळाडू खूप अनुभव आणणार आहे,’’ असे मुख्य प्रशिक्षक लोबेरा यांनी अनुभवी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले.

संबंधित बातम्या