ISL 2020-21 : एटीके मोहन बागान 2-2 गोलबरोबरीसह लीग विनर्स शिल्डसमीप

ISL
ISL

पणजी : हैदराबाद एफसीने सामन्यातील 85 मिनिटे दहा खेळाडूंसह खिंड लढविली, पण इंज्युरी टाईम खेळातील तिसऱ्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे त्यांना झुंजार विजय हुकला. एटीके मोहन बागानने दोन वेळा पिछाडीवरून येत सामना 2 - 2 गोलबरोबरीत राखला, त्यामुळे त्यांना लीन विनर्स शिल्डसमीप जाणे शक्य झाले.

सामना सोमवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. प्रीतम कोटल याने सेटपिसेसवर 90+3 व्या मिनिटास एटीके मोहन बागानला बरोबरी साधून दिली. यावेळी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याचा गलथानपणा हैदराबादला महागात पडला.

त्यापूर्वी पाचव्याच मिनिटास चिंगलेनसाना सिंग याला थेट रेड कार्ड मिळाले, तरीही त्यांनी आठव्या मिनिटास आरिदाने सांतानाच्या गोलमुळे आघाडी घेत पूर्वार्धात एटीके मोहन बागानला यश मिळू दिले नाही. 57 व्या मिनिटास मनवीर सिंगने कोलकात्याच्या संघाला बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू नेदरलँड्सचा रोलँड अलबर्ग याने 75 व्या मिनिटास हैदराबादला पुन्हा आघाडी मिळवून दिली होती.

आजच्या निकालामुळे आता स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा दिवस निर्णायक असेल. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत लीग विनर्स शिल्ड आणि एएफसी चँपियन्स लीग पात्रतेसाठी एटीके मोहन बागानला मुंबई सिटीविरुद्ध बरोबरी पुरेशी असेल. सध्या एटीके मोहन बागानचे 19 लढतीनंतर सर्वाधिक 40 गुण झाले असून मुंबई सिटीवर सहा गुणांची आघाडी मिळविली आहे. सलग पाच सामने जिंकल्यानंतर एटीके मोहन बागानने आज स्पर्धेतील एकंदरीत चौथी बरोबरी नोंदविली. हैदराबादची ही दहावी बरोबरी ठरली. सलग 11 सामने अपराजित असलेल्या संघाचे आता 19 लढतीनंतर 28 गुण झाले असून तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवापेक्षा दोन गुण कमी आहेत. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यातही 28 रोजी लढत होईल. त्या लढतीनंतर प्ले-ऑफ फेरीतील संघ निश्चित होतील.

सामन्याच्या पूर्वार्धात मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीने झुंजार खेळ केला. एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विल्यम्स याला मागून ओढणे चिंगलेनसाना याला खूपच महागात पडले, यावेळी विल्यम्स गोल करण्याच्या प्रयत्नात होता. रेफरीने थेट रेड कार्ड दाखविल्यामुळे हैदराबादला एका खेळाडूस मुकावे लागले.

हैदराबादचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आल्याची संधी एटीके मोहन बागानला साधता आली नाही. तीन मिनिटानंतर बचावपटू प्रीतम कोटल याच्या चुकीमुळे कोलकात्याच्या संघाला पिछाडीवर जावे लागले. प्रीतमचा बॅकपास चुकीचा ठरला. गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जकडे चेंडू जाण्यापूर्वीच आरिदाने सांतानाने झडप घालत आघाडीचा गोल नोंदविला. गोलरक्षक चेंडूपर्यंत पोहचेपर्यंत उशीर झाला होता.

विश्रांतीनंतरच्या बाराव्या मिनिटास गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या कमजोर बचावामुळे हैदराबादला आघाडी गमवावी लागली. डेव्हिड विल्यम्सच्या असिस्टवर मनवीरने चेंडूला योग्य दिशा दाखविताना हैदराबादच्या बचावातील त्रुटींचा लाभ उठविला.

उत्तरार्धातील कुलिंग ब्रेकपूर्वी सेटपिसेसवर हैदराबादने पुन्हा आघाडी मिळविली. तीन मिनिटांपूर्वी लिस्टन कुलासोच्या जागी मैदानात उतरलेल्या अलबर्ग याने गोल नोंदवत हैदराबादची बाजू वरचढ केली.

दृष्टिक्षेपात...

- आरिदाने सांतानाचे यंदा 18 लढतीत 10 गोल, एकंदरीत 32 आयएसएल सामन्यांत 19 गोल

- मनवीर सिंगचे मोसमातील 19 सामन्यांत 5 गोल, एकूण 66 आयएसएल लढतीत 8 गोल

- रोलँड अलबर्ग याचा 7 लढतीत 1 गोल

- पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानची हैदराबादशी 1-1 गोलबरोबरी

- प्रीतम कोटल याचा मोसमात 1 गोल, एकंदरीत 93 सामन्यात 4 गोल

- हैदराबाद एफसी सलग 11 सामने अपराजित, 4 विजय, 7 बरोबरी

- सलग 5 विजयानंतर एटीके मोहन बागानची बरोबरी
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com