ISL 2020-21 : एटीके मोहन बागान एक पाऊल दूर

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग पाच विजय नोंदवत जबरदस्त घोडदौड राखली आहे.

पणजी : एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग पाच विजय नोंदवत जबरदस्त घोडदौड राखली आहे. लीग विनर्स शिल्डचा मान आणि एएफसी चँपियन्स लीगची पात्रता त्यांच्या दृष्टिपथास आहे, त्यापासून ते फक्त दोन गुण दूर आहेत. हैदराबाद एफसीला सोमवारी नमविल्यास कोलकात्याचा संघ एक सामना राखून लक्ष्यप्राप्ती करू शकेल.

स्पर्धेच्या सातव्या मोसमातील महत्त्वपूर्ण लढत सोमवारी (ता. 22) वास्को येथील टिळक मैदानावर खेळली जाईल. प्ले-ऑफ फेरीसाठी दावेदार असलेला हैदराबाद संघही विजयासाठी इच्छुक आहे. पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांना उपांत्य फेरीच्या आणखी जवळ जाता येईल. हा संघ सलग 10 सामने अपराजित आहे. स्पॅनिश मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 18 लढतीतून 27 गुण असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने एटीके मोहन बागानला गोलबरोबरीत रोखले होते.

INDvsENG: मायकेल वॉनने पाकच्या मैदानाचा फोटो केला शेअर; खेळपट्टीवरून पुन्हा...

मुंबई सिटी एफसीला शनिवारी जमशेदपूर एफसीकडून हार पत्करावी लागली. हा निकाल एटीके मोहन बागानच्या पथ्यावर पडला आहे. बाकी दोन लढतीत दोन गुण मिळाले, की त्यांना साखळी फेरीत अग्रस्थान टिकवता येईल, जेणेकरून एएफसी चँपियन्स लीगसाठी प्रथमच पात्रता मिळेल. स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे सध्या सर्वाधिक 39 गुण असून त्यांनी मुंबई सिटीवर पाच गुणांची निर्णयाक आघाडी घेतली आहे. सलग पाच सामने जिंकताना त्यांनी 13 गोल नोंदवून वर्चस्व प्रदर्शित केले आहे. 

 

कृष्ण विरुद्ध सांताना

एटीके मोहन बागानचा फिजीयन स्ट्रायकर रॉय कृष्णा दमदार फॉर्ममध्ये आहे. या 33 वर्षीय आंतरराष्ट्रीय स्ट्रायकरने स्पर्धेत सर्वाधिक 14 गोल नोंदविले आहेत, त्यापैकी सात गोल मागील पाच लढतीतील आहेत. त्याच्या नावे चार असिस्टही आहेत. हैदराबादचा 33 वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांतान याने चमकदार खेळ करताना नऊ गोल केले आहेत. सोमवारच्या लढतीत दोन्ही संघ आपापल्या हुकमी स्ट्रायकरकडून गोलची अपेक्षा बाळगून असतील.

 

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानची कामगिरी : 18 सामने, 12 विजय, 3 बरोबरी, 3 पराभव, 39 गुण

- हैदराबाद एफसीची कामगिरी : 18 सामने, 6 विजय, 9 बरोबरी, 3 पराभव, 27 गुण

- एटीके मोहन बागानचे 26, तर हैदराबादचे 25 गोल

- हैदराबाद 10 लढती अपराजित, 4 विजय, 6 बरोबरी

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे 1-1 गोलबरोबरी

- हैदराबादच्या 7 क्लीन शीट्स, त्यापैकी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या 5
 

संबंधित बातम्या