रंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीला 1 - 1 गोलबरोबरीत रोखले.

पणजी : अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीला 1 - 1 गोलबरोबरीत रोखले.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. ओडिशाला सामन्याच्या आठव्याच मिनिटास ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने आघाडी मिळवून दिली, त्यानंतर 82व्या मिनिटास सेटपिसेसवर ऑस्ट्रेलियन एरिक पार्तालू याने शानदार हेडिंगद्वारे बंगळूरला बरोबरी साधून दिली. पूर्वार्धातील पिछाडीनंतर बंगळूरने उत्तरार्धात खूपच आक्रमक खेळ करत बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याची प्रेक्षणीय कामगिरीही निर्णायक ठरली.

बरोबरीचा एक गुण मिळाला, पण माजी विजेता बंगळूर संघ सलग सात सामने विजयाविना राहिला. त्यांची ही एकंदरीत पाचवी बरोबरी ठरली. 13 लढतीनंतर नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 14 गुण झाले आहेत. त्यांनी सातवा क्रमांक मिळविताना जमशेदपूरला आठव्या क्रमांकावर ढकलले. स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाचीही पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 13 लढतीतून आठ गुण झाले आहेत. त्यांचे तळाचे अकरावे स्थान कायम आहे.

ओडिशाने सामन्याच्या सुरवातीस बंगळूरला प्रतिहल्ल्यावर झटका दिला. ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याच्या मोसमातील सातव्या गोलमुळे भुवनेश्वरच्या संघाला आघाडी मिळाली. मान्युएल ओन्वू याने पेनल्टी क्षेत्रात दिलेल्या शानदार क्रॉस पासवर मॉरिसियोने गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूस चेंडू अडविण्याची संधीच दिली नाही. चेंडू गोलपट्टीच्या खालील भागास आपटून नेटमध्ये गेला.

सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना बंगळूर एफसीने पिछाडी भेदत बरोबरी साधली. क्लेटन सिल्वाच्या कॉर्नर किकवर पार्तालूचा हेडर गोलरक्षक अर्शदीपच्या हातास लागून नेटमध्ये गेला. सामना संपण्यास एक मिनिट असताना ओडिशाच्या जेरी माविमिंगथांगा याचा जोरदार फटका बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने विफल ठरविल्यामुळे गोलबरोबरीची कोंडी कायम राहिली. इंज्युरी टाईममध्ये अगदी जवळून अचूक फटका मारताना बंगळूरचा ख्रिस्तियन ओपसेथ गडबडला.

ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्यासाठी हा सामना संस्मरणीय ठरला. त्याने नेटसमोर एकाग्रता आणि दक्षतेचे अप्रतिम प्रदर्शन घडविले. त्यामुळे पूर्वार्धात ओडिशाची एका गोलची आघाडी अबाधित राहिली. विश्रांतीस सात मिनिटे बाकी असताना बंगळूरच्या एरिक पार्तालूचा प्रयत्न अर्शदीपने डावीकडे झेपावत एका हाताने अडवत फोल ठरविला. त्यानंतर तीन मिनिटांनी अर्शदीपने अचाट कौशल्य प्रदर्शित करत क्लेटन सिल्वाच्या कॉर्नर किकवर राहुल भेके याचा हेडर उजवीकडे झेपावत उत्कृष्टपणे अडविला. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास बंगळूरचा बदली खेळाडू ख्रिस्तियन ओपसेथ फ्रीकिक फटका अर्शदीपने अचूक अंदाज बांधत अडविला.

सामन्याच्या साठाव्या मिनिटास ओडिशाला आघाडी दोन गोलांची करणे शक्य होते, पण बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने सारा अनुभव पणास लावत जेरी माविमिंगथांगा याचा फटका रोखला. त्यानंतर सहा मिनिटांनी ख्रिस्तियन ओपसेथ चेंडू योग्य दिशा दाखवू शकल नाही, त्यामुळे गोलरक्षक अर्शदीपने जागा सोडल्याची संधी बंगळूरला साधता आली नाही.

दृष्टिक्षेपात...

- ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे यंदाच्या स्पर्धेत 8 गोल

- बंगळूरच्या एरिक पार्तालू याचे मोसमात 2 गोल, एकंदरीत 61 आयएसएल सामन्यात 9 गोल

- बंगळूरचे 7 सामन्यांत 2 बरोबरी, 5 पराभव

- ओडिशाचे सलग 2 सामने गोलबरोबरीत

 

संबंधित बातम्या