I League : चर्चिल ब्रदर्सचा आघाडी वाढविण्याकडे कल
I League

I League : चर्चिल ब्रदर्सचा आघाडी वाढविण्याकडे कल

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील मागील लढतीत पराभवाचा झटका बसल्याने चर्चिल ब्रदर्सची अग्रस्थानावरील आघाडी तीन गुणांवर आली आहे. विजेतेपदासाठी ती वाढविणे आवश्यक असून महम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध सोमवारी (ता. 15) खेळताना त्यांचा कल विजयाकडेच असेल. चर्चिल ब्रदर्स व महम्मेडन स्पोर्टिंग यांच्यातील सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे खेळला जाईल. चर्चिल ब्रदर्सचे सध्या 25 गुण असून त्यांच्या मागोमाग असलेल्या गोकुळम केरळा व टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) या संघांचे प्रत्येकी 22 गुण आहेत. हे दोन्ही संघ गाठणार नाहीत याची खात्री करण्यासाठी चर्चिल ब्रदर्सला महम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध विजय अत्यावश्यक असेल. कोलकात्यातील संघाच्या खाती 17 गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत.

चर्चिल ब्रदर्सला स्पर्धेत 11 सामने अपराजित राहिल्यानंतर मागील लढतीत गोकुळम केरळाने 3 - 0 फरकाने हरविले होते. महम्मेडन स्पोर्टिंगला अगोदरच्या लढतीत पंजाब एफसीविरुद्ध 3-3 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले.

"सोमवारचा सामना आव्हानात्मक असला, तरी आमच्या शैलीनुसार खेळत विजय मिळविण्याचा निर्धार आहे," असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. "आपला संघ प्रत्येक सामना जिंकण्याचे ध्येय बाळगतो आणि प्रत्येक सामन्यागणिक शिकतो, सध्या आम्ही बाकी सामन्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे," असे महम्मेडन स्पोर्टिंगचे प्रशिक्षक शंकरलाल चौधरी यांनी नमूद केले. 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सची कामगिरी : 12 सामने, 7 विजय, 4 बरोबरी, 1 पराभव, 25 गुण

- महम्म्डेन स्पोर्टिंगची कामगिरी : 12 सामने, 4 विजय, 5 बरोबरी, 3 पराभव, 17 गुण

- स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सचे 17, तर महम्मेडन स्पोर्टिंगचे 12 गोल

- पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्स व महम्मेडन स्पोर्टिंग सामना 0 - 0 बरोबरीत 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com