आयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

हैदराबाद व बंगळूर यांच्यातील सामना गुरुवारी वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.

पणजी : हैदराबाद एफसीने बंगळूर एफसीला गुरुवारी पराभूत केल्यास त्यांना सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळू शकतो. सध्या त्यांचे एफसी गोवाच्या तुलनेत दोन गुण कमी आहेत.

सलग सात सामने विजयाविना असलेला बंगळूर एफसी संघ सध्या कामगिरीतील घसरण थोपविण्यासाठी संघर्ष करत आहे. हैदराबाद व बंगळूर यांच्यातील सामना गुरुवारी (ता. 28) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. मागील पाच सामने अपराजित असलेल्या हैदराबाद एफसीचे सध्या 13 सामन्यांतून 18 गुण आहेत. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांच्या खाती एफसी गोवाच्या तुलनेत एक गुण जास्त जमा होईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने बंगळूरला नमविले होते, मात्र मागील तीन लढतीत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांच्यासाठीही विजय अत्यावश्यक असेल. तीनपैकी दोन लढतीत त्यांनी गोल स्वीकारलेला नाही. आपला संघ शैलीनुसार खेळत असल्याचे सांगून, हैदराबादच्या गोलक्षेत्रात बंगळूर संघाचा धोकादायक प्रवेश टाळण्यावर भर राहील, असे मार्किझ यांनी नमूद केले.

मुख्य अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील माजी विजेत्या बंगळूरची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. मागील सात लढतीत बरोबरीचे फक्त दोन प्राप्त केलेल्या या संघाने फक्त चार गोल नोंदविले असून दहा गोल स्वीकारले आहेत. सध्या त्यांच्या खाती 13 लढतीनंतर 14 गुण आहेत. प्ले-ऑफ फेरीसाठी दावा कायम राखण्यासाठी त्यांनी कामगिरी कमालीची उंचावणे आवश्यक आहे. आपल्या संघाने अजूनही प्ले-ऑफच्या आशा सोडलेल्या नाहीत, असे मूसा यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला नमूद केले. सध्या संघ व्यवस्थापन संघातील युवा खेळाडूंना पुढील मोसमाच्या तयारीसाठी वेळ देत असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादचे मागील 5 लढतीत 2 विजय, 3 बरोबरी

- बंगळूरच्या यापूर्वीच्या 7 सामन्यात 2 बरोबरी, 5 पराभव

- हैदराबादचे 13 लढतीत 4 विजय, 6 बरोबरी, 3 पराभव, 16 गोल

- बंगळूरचे 13 लढतीत 3 विजय, 5 बरोबरी, 5 पराभव, 15 गोल

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे जमशेदपूरचा बंगळूरवर 1-0 फरकाने मात

संबंधित बातम्या