ISL 2020-21: हैदराबादची नॉर्थईस्टशी गोलशून्य बरोबरी

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

हैदराबाद एफसी, तसेच नॉर्थईस्ट युनायटेडने गोलशून्य बरोबरीस देत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर प्रगती केली, पण स्थान भक्कम करणे जमले नाही.

पणजी : हैदराबाद एफसी, तसेच नॉर्थईस्ट युनायटेडने गोलशून्य बरोबरीस देत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर प्रगती केली, पण स्थान भक्कम करणे जमले नाही.

सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. हैदराबाद व नॉर्थईस्टची 16 लढतीतील ही प्रत्येकी आठवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 23 गुण झाले आहेत. त्यांनी एफसी गोवावर एका गुणाची आघाडी मिळविली आहे. हैदराबादला (+4) सरस गोलसरासरीमुळे तिसरा, तर नॉर्थईस्टला (+1) चौथा क्रमांक मिळाला. एफसी गोवा (22 गुण)संघ आता पाचव्या स्थानी गेला आहे.

ISL 2020-21: ईस्ट बंगालचा जमशेदपूरला पराभवाचा धक्का

पहिल्या टप्प्यात वास्को येथेच हैदराबादने नॉर्थईस्टचा 4-2 फरकाने पराभव केला, पण त्याची पुनरावृत्ती रविवारी झाली नाही. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता आठ सामने अपराजित आहे. त्यात तीन विजय व पाच बरोबरीचा समावेश आहे. अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. अन्य तीन विजयासह ते आता पाच सामने अपराजित आहेत.

पूर्वार्धातील खेळात हैदराबादने चेंडूवर जास्त प्रमाणात वर्चस्व राखले, पण त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडच्या गोलक्षेत्रात खोलवर मुसंडी मारणे जमले नाही. त्यामुळे गोलरक्षक सुभाशिष रॉय यालाही विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. सामन्याच्या अंतिम टप्प्यात नॉर्थईस्टने आघाडीसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश लाभले नाही. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना फेडेरिको गालेगो याच्या फ्रीकिकवर बेंजामिन लँबॉट याने हेडिंग साधले, मात्र ते दिशाहीन ठरले. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये लिस्टन कुलासोचा फटका थेट गोलरक्षक सुभाशिषच्या हाती गेल्याने हैदराबाद संघही आघाडीपासून दूर राहिला.

 

संबंधित बातम्या