आयएसएल : हैदराबादला ‘टॉप फोर’ची संधी
Copy of Gomantak Banner (11).jpg

आयएसएल : हैदराबादला ‘टॉप फोर’ची संधी

पणजी : हैदराबाद एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या चार संघांतील (टॉप फोर) स्थान राखण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना ओडिशा एफसीला नमविणे अत्यावश्यक असेल. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी (ता. 19) खेळला जाईल.

स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात हैदराबादने ओडिशाला एका गोलने हरविले होते, त्यानंतर आणखी तीन सामने जिंकत मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 11 लढतीतून 16 गुणांची कमाई केली आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवापेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत. मंगळवारी ओडिशाला नमविल्यास हैदराबादचा संघ गोव्यातील संघाला गुणतक्त्यात गाठेल. मागील लढतीत अव्वल स्थानावरील मुंबई सिटीस गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. संधी साधली असती, तर त्यांना मुंबई सिटीवर धक्कादायक विजय शक्य झाला असता. ‘‘नक्कीच आत्मविश्वास उंचावलेला आहे. मुंबईविरुद्धचा निकाल चांगला होता. शारीरिक, नियोजन आणि तांत्रिकदृष्ट्या संघाची कामगिरी उत्कृष्ट ठरली,’’ असे मार्किझ यांनी सांगितले.

स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसी संघ 11 लढतीतून फक्त सहा गुण मिळवून तळाच्या अकराव्या क्रमांकावर आहे. त्यांनी फक्त एकच सामना जिंकलेला आहे. अगोदरच्या लढतीत त्यांना चेन्नईयीन एफसीकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे स्पर्धेतील सर्वाधिक सात पराभव पत्करलेला संघ बनण्याची पाळी त्यांच्यावर आली. हैदराबाद संघ परिपूर्ण असला, तर त्यांच्याविरुद्ध सुधारित कामगिरी करण्याचे लक्ष्य बॅक्स्टर यांनी बाळगले आहे. 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादचे मागील 3 लढतीत 2 विजय, 1 बरोबरी

- पहिल्या टप्प्यात हैदराबादची ओडिशावर 1-0 फरकाने मात

- मागील 3 लढतीत ओडिशाचा 1 विजय, 1 बरोबरी, 1 पराभव

- हैदराबादचा आरिदाने सांताना व ओडिशाचा दिएगो मॉरिसियो यांचे प्रत्येकी 6 गोल

- हैदराबादच्या 3, तर ओडिशाची 1 क्लीन शीट
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com