ISL 2020-21 : जमशेदपूरला सहाव्या क्रमांकासाठी बंगळूरचे आव्हान

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात प्ले-ऑफ फेरीच्या स्पर्धेच्या शर्यतीतून बाद झालेल्या जमशेदपूर एफसी आणि बंगळूर एफसीसाठी मोहिमेतील शेवटचा सामना केवळ प्रतिष्ठेसाठी असेल, त्याचवेळी त्यांच्यात सहाव्या क्रमांकासाठी चुरस असेल.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात प्ले-ऑफ फेरीच्या स्पर्धेच्या शर्यतीतून बाद झालेल्या जमशेदपूर एफसी आणि बंगळूर एफसीसाठी मोहिमेतील शेवटचा सामना केवळ प्रतिष्ठेसाठी असेल, त्याचवेळी त्यांच्यात सहाव्या क्रमांकासाठी चुरस असेल.

जमशेदपूर व बंगळूर यांच्यातील सामना गुरुवारी (ता. 25) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. सध्या जमशेदपूरचे 24, तर बंगळूरचे 22 गुण आहेत. शेवटच्या साखळी लढतीत विजय नोंदविला किंवा बरोबरी साधल्यास जमशेदपूरचा सध्याचा सहावा क्रमांक कायम राहील. बंगळूरने पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास ते जमशेदपूरला मागे टाकून सहाव्या स्थानी येतील.

INDvsENG 3rd Day1 : अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अडचणीत 

बंगळूरसाठी यंदा मोसमात बचावफळीने दगा दिला. त्यांनी तब्बल 25 गोल स्वीकारले. त्यामुळेच 2017-18 मोसमात आयएसएल स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर प्रथमच हा संघ प्ले-ऑफ फेरी गाठू शकला नाही. मागील लढतीत एफसी गोवाकडून हार पत्करल्यामुळे बंगळूरचे आव्हान आटोपले. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसी संघ प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीत होता, पण कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने स्पर्धेतील आगेकूच राखू शकला नाही. जमशेदपूरने मागील लढतीत मुंबई सिटीस पराभवाचा धक्का दिला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

 

दृष्टिक्षेपात...

- जमशेदपूर एफसीची कामगिरी : 19 सामने, 6 विजय, 6 बरोबरी, 7 पराभव, 24 गुण

- बंगळूर एफसीची कामगिरी : 19 सामने, 5 विजय, 7 बरोबरी, 7 पराभव, 22 गुण

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे जमशेदपूरचा बंगळूरवर 1-0 फरकाने विजय

- जमशेदपूरच्या नेरियूस व्हाल्सकिसचे 8, तर बंगळूरच्या क्लेटन सिल्वा व सुनील छेत्री यांचे प्रत्येकी 7 गोल

 

संबंधित बातम्या