ISL 2020-21 : आघाडी राखण्यासाठी मुंबई सिटीचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमाची प्ले-ऑफ फेरी निश्चित केलेल्या मुंबई सिटी एफसीचा भर आता अग्रस्थान राखण्यावर असेल. सोमवारी (ता. 15) संघर्ष करणाऱ्या बंगळूर एफसीला नमविल्यास गुणतक्त्यातील पहिला क्रमांक त्यांच्यापाशीच राहील.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमाची प्ले-ऑफ फेरी निश्चित केलेल्या मुंबई सिटी एफसीचा भर आता अग्रस्थान राखण्यावर असेल. सोमवारी (ता. 15) संघर्ष करणाऱ्या बंगळूर एफसीला नमविल्यास गुणतक्त्यातील पहिला क्रमांक त्यांच्यापाशीच राहील.

मुंबई सिटी आणि बंगळूर यांच्यातील सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने 16 पैकी 10 सामने जिंकून 34 गुणांची कमाई केली आहे. सोमवारी त्यांनी आणखी एक विजय नोंदविल्यास मुंबईच्या संघास एटीके मोहन बागानला दुसऱ्या क्रमांकावर ठेवणे शक्य होईल. साखळी फेरीत अव्वल स्थान राखल्यास मुंबई सिटीस एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता मिळेल.

INDvsENG 2ndT Day2: टीम इंडिया मजबूत स्थितीत; अश्विनच्या फिरकीमुळे इंग्लंडचे...

सामन्याच्या पूर्वसंध्येला लोबेरा यांनी सांगितले, की ``आमची स्थिती खूपच चांगली आहे. आम्ही चांगले काम केले आहे. चुकांपासून बोध घेत प्रगती शक्य आहे. माझा संघ महत्त्वाकांक्षी आहे. या दृष्टिकोनामुळे बाकी सामन्यांबाबत मी सकारात्मक आहे.`` निलंबनामुळे मुंबई सिटीचा हुकमी मध्यरक्षक ह्युगो बुमूस बंगळूरविरुद्ध खेळू शकणार नाही. मागील लढतीत त्यांना एफसी गोवाने पिछाडीवरून येत 3 - 3 गोलबरोबरीत रोखले होते

दुसरीकडे अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर संघाच्या खाती 17 लढतीनंतर 19 गुण आहेत. प्ले-ऑफ फेरीच्या अंधूक आशा कायम राखण्यासाठी त्यांना बाकी तिन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीने बंगळूरला हरविले होते. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत फक्त दोन पराभव पत्करले असून ते सर्वांत कमी आहेत. मुंबई सिटीचे बचावही भक्कम आहे. त्यांचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने आठ लढतीत गोल स्वीकारलेला नाही. बंगळूरच्या आक्रमणात समन्वयाचा अभाव आहे., तसेच बचावफळीही कमजोर आहे. त्यांनी 21 गोल स्वीकारले आहे. मागील लढतीत त्यांना एटीके मोहन बागानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

 

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीची कामगिरी : 16 सामने, 10 विजय, 4 बरोबरी, 2 पराभव

- बंगळूरची कामगिरी : 17 सामने, 4 विजय, 7 बरोबरी, 6 पराभव

- मुंबई सिटीच्या 8, तर बंगळूरच्या 4 क्लीन शीट्स

- मुंबई सिटीचे 25, तर बंगळूरचे 19 गोल

- पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे मुंबई सिटीचा बंगळूरवर 3-1 फरकाने विजय

- मुंबई सिटीविरुद्ध मागील 5 लढतीत बंगळूरचे 4 पराभव, 1 बरोबरी
 

 

संबंधित बातम्या