आयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले

आयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले
Copy of Gomantak Banner (56).jpg

पणजी : मुंबई सिटीचा बचावपटू अहमद जाहू याच्या टाळता येणाऱ्या चुकीमुळे मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर ईस्माईल गोन्साल्विस याने अचूक फटका मारत चेन्नईयीन एफसीची पिछाडी भरून काढली. अखेरीस 1-1 गोलबरोबरीमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

सामना सोमवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोमेव ओगबेचे याने 21व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडत मुंबई सिटीस आघाडी मिळवून दिली. 36 वर्षीय ओगबेचे याचा हा आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक 32वा गोल ठरला. गिनी बिसाँच्या ईस्माईल गोन्साल्विस (ईस्मा) याने 76व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर चेन्नईयीन एफसीला बरोबरी साधून दिली.

मुंबई सिटीने बरोबरीच्या निकालासह आयएसएल स्पर्धेत सलग 12 सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला. 13 लढतीत नऊ विजय व तीन बरोबरीसह त्यांचे 30 गुणांसह अग्रस्थान कायम राहिले आहे. त्यांनी दुसऱ्या स्थानावरील एटीके मोहन बागानवर सहा गुणांची आघाडी मिळविली आहे. चेन्नईयीनची ही सातवी बरोबरी ठरली. त्यांचे 14 लढतीनंतर 16 गुण झाले असून पाचव्या क्रमांकावर प्रगती केली.

मुंबई सिटीचा मोरोक्कन बचावपटू अहमद जाहू याच्या चुकीमुळे चेन्नईयीनला पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. गोलरक्षक अमरिंदर सिंगकडून मिळालेल्या शॉर्ट पासवर अहमद जाहूने चेंडू नियंत्रित करताना आळशीपणा दाखविला, त्यावेळी चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी पुढे आलेल्या चेन्नईयीनच्या याकुब सिल्व्हेस्टर याला पेनल्टी क्षेत्रात पाडण्याची फार मोठी चूक जाहूने गेली. पेनल्टी फटक्यावर ईस्मा याने गोलरक्षकाच्या उजव्या बाजूने सणसणीत फटक्यावर बरोबरीचा गोल केला.

मुंबई सिटीला आघाडी सेटपिसेसवर मिळाली. अमेय रानावडे याच्या लांब थ्रोईनवर चेंडू चेन्नईयीनच्या बचावपटूस आपटून रॉवलिन बोर्जिसकडे गेला. मुंबई सिटीच्या मध्यरक्षकने चेंडू बिपिन सिंगकडे पास केला. त्याने चेंडूवर नियंत्रण राखत पेनल्टी क्षेत्रात ओगबेचे याच्या दिशेने सुरेख पास दिला, यावेळी नायजेरियन खेळाडूने अचूक हेडिंग साधत सर्जिओ लोबेरा यांच्या संघाचे गोलखाते उघडले.

त्यापूर्वी सामन्यातील पहिली पाच मिनिटे खूपच उत्कंठावर्धक ठरली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास चेन्नईयीनच्या लाल्लियानझुआला छांगटे याने मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याची परीक्षा पाहिला, पण यश लाभले नाही. तीन मिनिटानंतर मुंबई सिटीच्या रेनियर फर्नांडिस याने दिशाहीन फटका मारून अगदी सोपी संधी वाया घालविली.

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीच्या बार्थोलोमेव ओगबेचे याचे मोसमातील 13 लढतीत 5 गोल

- ओगबेचे याचे आयएसएलमध्ये 47 लढतीत 32 गोल, सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्यांत तिसरा

- चेन्नईयीनच्या ईस्माईल गोन्साल्विस याचे 10 लढतीत 4 गोल, त्यापैकी 3 पेनल्टीवर

- यंदाच्या आयएसएलमध्ये मुंबई सिटीने 5 लढतीत स्वीकारलेला पाचवा गोल

- 12 अपराजित लढतीत मुंबई सिटीचे 9 विजय, 3 बरोबरी

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथेच मुंबई सिटीचा चेन्नईयीनवर 2-1 फरकाने विजय
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com