ISL 2020-21: सलग चार बरोबरीनंतर बलाढ्य मुंबई सिटीविरुद्ध जिंकण्याचा दबाव एफसी गोवासमोर 

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटी आणि एफसी गोवा यांच्यातील सामना सोमवारी खेळला जाईल. सध्याचा फॉर्म पाहता, मुंबईतील संघाचे पारडे जड असेल, तर गोव्यातील संघाला जोरदार मुसंडी मारावी लागेल.

पणजी : एफसी गोवास सलग चार लढतीत बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. काही चुका घडल्याचे मान्य करून त्या टाळण्यासाठी मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो प्रयत्नशील आहेत. सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य मुंबई सिटीविरुद्ध खेळताना त्यांच्यावर जिंकण्याचा दबाव असेल.

ISL 2020 21: एटीके मोहन बागानच्या मनवीर, कृष्णाचा धडाका; दुसऱ्या क्रमांकावर कायम

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर मुंबई सिटी आणि एफसी गोवा यांच्यातील सामना सोमवारी (ता. 8) खेळला जाईल. सध्याचा फॉर्म पाहता, मुंबईतील संघाचे पारडे जड असेल, तर गोव्यातील संघाला जोरदार मुसंडी मारावी लागेल. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 15 पैकी 10 सामने जिंकले असून 33 गुणांसह ते अव्वल आहेत. एफसी गोवाचे त्यांच्यापेक्षा 11 गुण कमी आहेत. 15 पैकी पाच सामने जिंकलेल्या या संघाचे 22 गुण आहेत. गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकासाठी एफसी गोवासाठी मुंबई सिटीविरुद्ध विजय अत्यावश्यक आहे.

"मुंबई सिटीविरुद्धचा सामना आमच्यासाठी सर्वसामान्य असेल. इतर लढतींप्रमाणेच पूर्ण तीन गुण मिळविण्याचे लक्ष्य असेल. विशेषतः बरोबरीत राहिलेल्या मागील काही सामन्यांत चुका केल्या. त्या टाळून प्रगती साधायची आहे आणि चांगले खेळण्याचे उद्दिष्ट्य आहे," असे फेरांडो सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीने एफसी गोवा 1-0 फरकाने हरविले होते.

खेळाडूंच्या दुखापतीची चिंता

मुंबई सिटीने मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला 2-1 फरकाने हरविले, तर दोन पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवास नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 2-2 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. सलग चार लढतीतून त्यांना फक्त चार गुण मिळाले आहेत. मुंबई सिटीने स्पर्धेत सर्वांत कमी आठ गोल स्वीकारले आहेत. त्यांचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने आठ लढतीत क्लीन शीट राखली आहे. दुसरीकडे एफसी गोवाच्या बचावफळीवर दबाव आहे. जेम्स डोनाकी पूर्ण तंदुरुस्त नाही. संघात नवे खेळाडू आले आहेत, पण ते अजून संघाच्या शैलीत पूर्णपणे रुळलेले नाहीत. फेरांडो यांनी खेळाडूंच्या दुखापतीची चिंता आहे. प्रमुख मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. "संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे चिंता आहे. चोवीस तासातील त्यांची तंदुरुस्ती पाहूनच संघ निवड केली जाईल," असे फेरांडो यांनी नमूद केले. मागील सामन्यासाठी निलंबित असलेला कर्णधार एदू बेदिया एफसी गोवासाठी उपलब्ध असेल.

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवा व मुंबई सिटी यांच्यात आयएसएलमध्ये 15 लढती

- एफसी गोवाचे 7, मुंबई सिटीचे 5 विजय, 3 बरोबरी

- यंदा एफसी गोवा सलग 8 सामने अपराजित, 3 विजय, 5 बरोबरी

- मुंबई सिटीचे सर्वाधिक 22, तर एफसी गोवाचे 21 गोल

- एफसी गोवाच्या इगोर आंगुलोचे 10, मुंबई सिटीच्या एडम ली फाँड्रे याचे 8 गोल

- मुंबई सिटीचा ह्यूगो बुमूस व एफसी गोवाचा आल्बर्टो नोगेरा यांचे प्रत्येकी 6 असिस्ट
 

संबंधित बातम्या