ISL 2020-21 : मागील पाच लढतीत मुंबई सिटीचा फक्त एक विजय; ओडिशावर वर्चस्व अपेक्षित

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांना सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीबाबत अजिबात चिंता नाही, ती जागा यापूर्वीच निश्चित झाली आहे, मात्र या मातब्बर संघाचा बचाव सध्या तणावाखाली आहे. मागील पाच लढतीत त्यांनी फक्त एकच सामना जिंकला असून तब्बल बारा गोल स्वीकारले आहेत.

पणजी : मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांना सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीबाबत अजिबात चिंता नाही, ती जागा यापूर्वीच निश्चित झाली आहे, मात्र या मातब्बर संघाचा बचाव सध्या तणावाखाली आहे. मागील पाच लढतीत त्यांनी फक्त एकच सामना जिंकला असून तब्बल बारा गोल स्वीकारले आहेत.

मुंबई सिटी आणि ओडिशा एफसी यांच्यातील सामना बुधवारी (ता. 24) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल, त्यावेळी मुंबईतील संघाचे वर्चस्व अपेक्षित असेल. मात्र सलग दोन सामने गमावलेला लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ दबावाखालीही असेल. सलग बारा सामने अपराजित राहण्याचा पराक्रम बजावल्यानंतर मुंबई सिटीची मागील पाच लढतीत घसरण झाली. नॉर्थईस्ट युनायटेड, बंगळूर व जमशेदपूर संघाकडून पराभव पत्करावे लागले, एफसी गोवाने बरोबरीत रोखले, तर फक्त केरळा ब्लास्टर्सला नमविले आहे. हुकमी मध्यरक्षक ह्युगो बुमूसच्या चार सामन्यांच्या निलंबनाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे जाणवते.

INDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ? गौतम गंभीरनेच दिले याचे...

मुंबई सिटीचे सध्या 18 लढतीतून 34 गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अव्वल स्थानावरील एटीके मोहन बागानपेक्षा त्यांचे सहा गुण कमी कायम आहेत. ओडिशाविरुद्ध पूर्ण तीन गुण पटकावण्याचे मुंबई सिटीचे ध्येय राहील, त्यामुळे लीग विनर्स शिल्डची अंधूक आशा त्यांना जागवता येईल. ओडिशा एफसी शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त सामना जिंकला आहे. खाती केवळ नऊ गुण असलेल्या ओडिशाचा बचाव खूपच कमकुवत आहे. सलग नऊ सामने ते विजयाविना आहेत. त्यामुळे मुंबई सिटीला अपयशी मालिका खंडित करण्याची संधी मिळू शकते.

 

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीची कामगिरी : 18 सामने, 10 विजय, 4 बरोबरी, 4 पराभव, 34 गुण

- ओडिशा एफसी : 18 सामने, 1 विजय, 6 बरोबरी, 11 पराभव, 9 गुण

- मुंबई सिटी मागील 5 लढतीत 1 विजय, 1 बरोबरी, 3 पराभव

- ओडिशा एफसी सलग 9 सामने विजयाविना, 4 बरोबरी, 5 पराभव

- मुंबई सिटीच्या स्पर्धेत 8 क्लीन शीट्स, पण मागील 6 लढतीत एकही नाही

- प्रतिस्पर्ध्यांचे ओडिशावर 33 गोल, केरळा ब्लास्टर्स (34) नंतर दुसरे

- मुंबई सिटीच्या एडम ली फाँड्रचे 11, ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे 10 गोल

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे मुंबई सिटी 2-0 फरकाने विजयी

संबंधित बातम्या