ISL2020: ओडिशाने नॉर्थईस्ट युनायटेडला रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

ओडिशा एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलग पाचव्या पराभवाची नामुष्की टाळताना मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेडला 2-2 गोलबरोबरीत रोखले. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. लागोपाठ चार सामने गमावल्यानंतर भुवनेश्वरच्या संघाने गुण प्राप्त केला.

पणजी- ओडिशा एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलग पाचव्या पराभवाची नामुष्की टाळताना मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेडला 2-2 गोलबरोबरीत रोखले. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. लागोपाठ चार सामने गमावल्यानंतर भुवनेश्वरच्या संघाने गुण प्राप्त केला.

दोन्ही संघ विश्रांतीला 1-1 असे गोलबरोबरीत होते. ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याने 23व्या मिनिटास ओडिशाच्या खाती गोलची भर टाकली. मात्र 45+1व्या मिनिटास बेल्जियन बचावपटू कर्णधार बेंजामिन लँबॉट याच्या भेदक हेडरमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने बरोबरी साधली. घाना देशाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर क्वेसी अप्पिया याने 65व्या मिनिटास पेनल्टीवर नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी मिळवून दिल्यानंतर लगेच 67व्या मिनिटास शानदार सेटपिसेसवर दक्षिण आफ्रिकन आंतरराष्ट्रीय कोल अलेक्झांडर याने ओडिशासाठी बरोबरीचा गोल केला.

स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाची ही दुसरीच बरोबरी ठरली. त्यांचे आता सात लढतीत दोन बरोबरी व पाच पराभवासह दोन गुण झाले आहे. ते आता दहाव्या क्रमांकावर आले आहेत. जमशेदपूरला बरोबरीत रोखल्यानंतर ओडिशा संघ ओळीने चार सामन्यात हरला होता. मोसमात विजय पुन्हा एकदा ओडिशा संघाला दुरावला. जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टची ही आठ लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. दोन विजय आणि एका पराभवासह त्यांचे 11 गुण झाले असून चौथा क्रमांक कायम आहे.

ओडिशाने आघाडी घेताना केलेला गोल वादग्रस्त ठरला. दिएगो मॉरिसियोचा फटका नॉर्थईस्टच्या लालेंगमाविया याच्या पायाला चाटून नेटमध्ये गेला, ओडिशाचे खेळाडू जल्लोष करत असताना लाईन्समॅनने ऑफसाईडची खूण केली, नंतर रेफऱी प्रतीक मंडल यांनी आपल्या सहाय्यकांशी चर्चा गेल्यानंतर गोलचा असल्याचा निर्णय दिला. पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममधील पहिल्याच मिनिटास ओडिशाची आघाडी भेदली गेली. आशुतोष मेहताच्या सणसणीत फटक्यावर लँबॉट याने साधलेले वेगवान हेडिंग रोखणे ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला अशक्य ठरले.

विश्रांतीनंतर दोन मिनिटात दोन गोल झाल्यामुळे पुन्हा बरोबरीची कोंडी झाली. ओडिशाला गोलरक्षक अर्शदीप सिंग याने गोलक्षेत्रात नॉर्थईस्टच्या क्वेसी अप्पिया याला पाडले. रेफरींनी गोलरक्षकाला यलो कार्ड दाखवत पेनल्टी फटक्याची खूण केली. यावेळी घानाच्या खेळाडूंने अचूक नेम साधला. मात्र गुवाहाटीतील संघाचा आनंद फार काळ टिकला नाही. थ्रो-ईनवर दिएगो मॉरिसियोच्या पासवर जेरी माविहमिंगथांगा याच्या असिस्टवर अलेक्झांडर याने ताकदवान फटक्यावर गोलरक्षक गुरमीत याला पूर्णतः हतबल ठरवत भुवनेश्वरस्थित संघाला बरोबरी साधून दिली.

 

दृष्टिक्षेपात...

- ओडिशाचा ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याचे 7 लढतीत 3 गोल

- मॉरिसियोचे यापूर्वी जमशेदपूरविरुद्ध 2 गोल

- नॉर्थईस्ट युनायडेचा बेल्जियन बचावपटू बेंजामिन लँबॉटचा 8 लढतीत 1 गोल

- नॉर्थईस्टचा घाना देशाचा आघाडीपटू क्वेसी अप्पिया याचे 8 लढतीत 3 गोल

- ओडिशाचा दक्षिण आफ्रिकन मध्यरक्षक कोल अलेक्झांडरचा 6 लढतीत 1 गोल

- यंदाच्या आयएसएलमध्ये नॉर्थईस्ट युनायटेडच्या सर्वाधिक 5 बरोबरी

संबंधित बातम्या