Goa Professional Football League : साळगावकर, स्पोर्टिंग यांच्यातील सामना अनिर्णित

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

साळगावकर एफसी व स्पोर्टिंग क्लब द गोवा या माजी विजेत्या संघांना रविवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गोलबरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेला रंगतदार सामना 1 - 1 बरोबरीत राहिला.

पणजी : साळगावकर एफसी व स्पोर्टिंग क्लब द गोवा या माजी विजेत्या संघांना रविवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गोलबरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेला रंगतदार सामना 1 - 1 बरोबरीत राहिला.

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. मार्कुस मस्कारेन्हास याने सामन्याच्या पाचव्याच मिनिटास स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली. मोसमात साळगावकर एफसीने 545 मिनिटानंतर स्वीकारलेला हा पहिला गोल ठरला. नंतर 29व्या मिनिटास साईश हळर्णकर याने पेनल्टी फटक्यावर साळगावकर एफसीची पिछाडी भरून काढली. 

I-League : आय-लीग विजेतेपदाची उत्कंठा वाढली

स्पोर्टिंगच्या जोएल कुलासो याने साळगावकरच्या खेळाडूंना चकवा देत चेंडूसह मुसंडी मारली व फिलिप ओदोग्वू याला पास दिला. यावेळी साळगावकरच्या बचावपटूने ओदोग्वू याला रोखण्याच्या प्रयत्न केला असता, त्याने चेंडू सहकारी मार्कुस मस्कारेन्हासच्या हवाली केला. यावेळी मार्कुसने सहजतेने स्पोर्टिंगचे गोलखाते उघडले. अर्ध्या तासाच्या खेळापूर्वी साळगावकर एफसीला पेनल्टी फटका मिळाला. गोलक्षेत्रात साळगावकरच्या स्टेफ्लॉन डिकॉस्ता याला स्पोर्टिंगच्या एल्टन वाझ याने पाडल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली. साईश हळर्णकरने शांतपणे फटका अचूक ठरविला.

उत्तरार्धात दोन्ही संघांना बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. स्पोर्टिंग क्लबच्या मायरन फर्नांडिसला रिबाऊंडवर गोल करता आला नाही. साळगावकरच्या स्टीफन सतरकर याचा प्रयत्न गोलपट्टीवरून गेला, तर इंज्युरी टाईममध्ये स्टीफनचा धोकादायक हेडर स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाने वेळीच रोखला.
 

संबंधित बातम्या