मेस्सीला क्‍लब सोडण्यासाठी मोजावे लागतील ७० कोटी युरो

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करारानुसार १० जूनपर्यंत मेस्सीने क्‍लब सोडल्यास त्याच्यासाठी क्‍लबला एकही पैसा द्यावा लागणार नाही. मात्र त्यानंतर सोडल्यास ७० कोटी युरो द्यावे लागतील, असे म्हटले आहे.

माद्रिद: लिओनेल मेस्सीला बार्सिलोनाचा निरोप घ्यायचा असेल तर त्याच्या खरेदीसाठी क्‍लबला ७० कोटी युरो देणे भाग आहे. मेस्सीला करारबद्ध करणाऱ्या क्‍लबसाठी ही अट बंधनकारक असेल, असे ला लिगाने स्पष्ट केले.

बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करारानुसार १० जूनपर्यंत मेस्सीने क्‍लब सोडल्यास त्याच्यासाठी क्‍लबला एकही पैसा द्यावा लागणार नाही. मात्र त्यानंतर सोडल्यास ७० कोटी युरो द्यावे लागतील, असे म्हटले आहे. आता मोसमाची सांगताच उशिरा झाली आहे. चॅम्पियन्स लीगने मोसमाची सांगता होते, त्यानंतर लगेचच आपण मुक्त करण्याचे पत्र लिहिले आहे, असा मेस्सीचा दावा आहे, तर मुदत संपून काही महिने झाले आहेत, असा बार्सिलोनाचा दावा आहे. बार्सिलोनास ला लिगाने अर्थात स्पॅनिश लीगने पाठिंबा दिला आहे. 

ला लिगा मोसमास १२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील चर्चेसही फारसा वेळ नाही. ला लिगाने ट्विट करीत बार्सिलोनास पाठिंबा दिला, पण त्याचवेळी स्पॅनिश माध्यमातील अभ्यासकांनी ७० कोटी युरो भरपाईचा मुद्दा २०१९-२० चा मोसम संपल्यावरच संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. या परिस्थितीत ला लिगाला बार्सिलोनाची बाजू घेण्याचा फटका बसू शकेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या