इंग्लंडच्या विजयानंतर मायकल वॉनचे भाकित

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

पहिल्या आणि तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून सामना आपल्या खिशात घातला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय संपादन केला होता. मात्र तिसऱ्या सामनन्य़ामध्ये जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या धमाकेदार खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने पुन्हा भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. बटलर आणि बेअरस्टो यांनी अनुक्रमे 83 आणि 40 नाबाद धावा केल्या. मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू व कर्णधार मायकल वॉनने ट्विट करत जो संघ नाणेफेक जिंकेल तोच यावर्षी खेळवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी- ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी होणार असल्याचे म्हटले आहे. 

सध्या सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत तीन टी-ट्वेन्टी सामने पार पडले आहेत. आणि या प्रत्येक सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ विजयी ठरला आहे. पहिल्या आणि तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून सामना आपल्या खिशात घातला. तर दुसर्‍या सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून विजय मिळवला होता. याशिवाय या तीनही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणार्‍या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा पर्याय स्वीकारला होता. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन इंग्लंड संघाचा माजी खेळाडू मायकल वॉनने भारतात आगामी खेळवण्यात येणारी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धा नाणेफेक जिंकणारा संघ विजयी होऊ शकेल असे म्हटले आहे. 

INDvsENG : जोस बटलरच्या अर्धशतकीय खेळीमुळे पाहुण्या इंग्लंडचा टीम इंडियावर विजय 

मायकल वॉनने सोशल मीडियावरील ट्विटरवर याबाबत ट्विट करताना, असे दिसते आहे की भारतातील यंदा होणारी टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा सर्वोत्तम टॉसर जिंकू शकतो असे म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 157 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघाला दिले होते. कर्णधार कोहलीच्या 46 चेंडूमधील 77 धावांच्या धमाकेदार खेळीमुळे भारताने निर्धारीत 20 षटकांमध्ये 156 धाव संख्या उभारल्या होत्या. त्यानंतर जोस बटलर आणि बेअरस्टो यांनी चांगली भागीदारी रचत इंग्लंडच्या संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला.     

दरम्यान, तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवून मालिकेत 2 - 1 ने आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील चौथा टी-ट्वेन्टी सामना गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणार हे क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सुकता वाढवणारे असणार आहे.

 

संबंधित बातम्या