मध्यरक्षक रॉवलिनची आश्वासक छाप

rowlin borges
rowlin borges

पणजी

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या मागील दोन मोसमात गोव्याच्या रॉवलिन बोर्जिसने आश्वासक छाप पाडली आहे. गतमोसमात मुंबई सिटी एफसीकडून, तर त्यापूर्वी नॉर्थईस्ट युनायटेडकडून खेळताना या २८ वर्षीय मध्यरक्षकाने उल्लेखनीय खेळ केला.

‘आयएसएल’ला दिलेल्या मुलाखतीत रॉवलिनने आतापर्यंतच्या वाटचालीतील पैलू उघड केले. भारताचा माजी गोमंतकीय मध्यरक्षक क्लायमॅक्स लॉरेन्स, भारतीय संघाचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांच्यासह झिनेदिन झिदान, रोनाल्डो हे आपले आदर्शवत खेळाडू असल्याचे सासष्टीतील नुवे येथे जन्मलेल्या रॉवलिनने नमूद केले.

लहान असताना वडिलांसमवेत आपण फातोर्डा येथे फुटबॉल सामने पाहायला जात असे. लहानपणी क्लायमॅक्स हीरो होता. शिवाय सुनीलचा (छेत्री) खेळ पाहायला आवडत असे. परदेशी खेळाडूंत झिनेदिन झिदान व रोनाल्डो आपले आदर्श होते. आदर्शवत खेळाडूंच्या शैलीचे मित्रांसमवेत खेळत असताना अनुकरण करण्यावर आपला भर असायचा, असे रॉवलिनने सांगितले.

निवडीने आश्चर्यचकीत

भारताच्या सीनियर राष्ट्रीय संघात पहिल्यांदा निवड झाल्यानंतर आपण आश्चर्यचकीत झालो होतो, असे रॉवलिनने प्रामाणिकपणे सांगितले, कारण तेव्हा तो स्पोर्टिंग क्लब द गोवा संघातही नियमित खेळाडू नव्हता. स्पोर्टिंग क्लबकडून तो २०११ ते २०१६ या कालावधीत खेळला. भारतीय संघात नवा असताना केविन लोबो आणि फ्रान्सिस फर्नांडिस या गोमंतकीय खेळाडूंनी आपल्याला सांभाळून घेतल्याचे रॉवलिनने नम्रतापूर्वक सांगितले. सुनील छेत्री व जेजे लालपेखलुआ यांच्यासोबत भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आपण खूपच बावरल्याचेही त्याने मान्य केले. रॉवलिन आतापर्यंत भारताकडून ३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून दोन गोल नोंदविले आहेत. २०१५ साली त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

गोव्याबाहेर खेळण्याचा दबाव

नॉर्थईस्ट युनायटेडशी करारबद्ध झाल्यानंतर प्रथमच गोव्याबाहेर खेळताना दबाव आला होता ही बाब रॉवलिनने मान्य केली आहे. हा मध्यरक्षक म्हणाला, ‘‘आयएसएलचे पहिले दोन मोसम चुकल्यामुळे मी निराश होतो, पण संधी मिळणार आणि खेळणार हे जाणून होतो. त्यानंतर मला राष्ट्रीय संघाल बोलावणे आले आणि नंतर नॉर्थईस्ट युनायटेडचा करार मिळाला. २०१६ साली मी खूप दबावाखाली होतो, कारण गोव्याबाहेर खेळण्याची माझी ती पहिलीच वेळ होती.’’ २०१७-१८ मध्ये दुखापतीशी संघर्ष केल्यानंतर रॉवलिनने २०१८-१९ मोसमात उसळी घेतली, त्याचे श्रेय त्याने नॉर्थईस्ट युनायटेडचे माजी प्रशिक्षक एल्को शाटोरी यांना दिले आहे.

‘आयएसएल’मध्ये प्रभावी

रॉवलिन बोर्जिसने ५ जूनला २८वा वाढदिवस साजरा केला. गोव्यात स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाकडून खेळत असताना, प्रभावी खेळामुळे या शैलीदार मध्यरक्षकाची भारताच्या सीनियर राष्ट्रीय संघात वर्णी लागली. आयएसएलच्या प्रारंभीचे दोन मोसम मुकल्यानंतर २०१६-१७ ते २०१८-१९ असे तीन मोसम त्याने गुवाहाटीस्थित नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रतिनिधित्व केले. २०१८-१९ मधील आयएसएल मोसमात त्याने १८ सामन्यांत ४ गोल व २ असिस्ट अशी देखणी कामगिरी बजावली. गतमोसमात तो मुंबई सिटी एफसी संघात दाखल झाला. जॉर्ज कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना त्याने १५ सामन्यांत २ गोल व २ असिस्टची नोंद केली. मुंबई सिटी संघासोबत त्याचा करार ३१ मे २०२२ पर्यंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com