कोरोनामुळे मिल्खा सिंग यांचे निधन

कोरोनामुळे मिल्खा सिंग यांचे निधन
milkha.jpg

चंडीगड: भारताने महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे शुक्रवारी रात्री कोरोना विषाणू संसर्गामुळे (Covid19) निधन झाले. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. मिल्खा यांनी 1958 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तसेच 1960 मधील रोम ऑलिंपिक स्पर्धेत (Covid19)ही त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) त्यांनी चार वेळा सुवर्णपदक पटकाविले होते.

फ्लाईंग शीख (Flying Sikh) या टोपण नावाने ओळखले जाणारे मिल्खा गेल्या 20 मे रोजी कोविड बाधित ठरले होते. गुरुवारी त्यांची तब्येत चांगली होती; पण रात्री त्यांना अचानक ताप आला. तो वाढतच गेला. त्याचबरोबर ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली आहे. त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे गेल्या रविवारी कोरोनामुळे निधन झाले होते. (Milkha Singh dies due to corona)

मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट
मिल्खा सिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट (Bhaag Milkha Bhaag) देखील काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी मिल्खा यांनी केवळ निर्मात्याकडून केवळ एक रुपया घेतला होता. विशेष म्हणजे संबधित एक रुपयाचे नाणे हे 1958 साली तयार केले होते. त्याचवर्षी मिल्खा यांनी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. हे स्वतंत्र भारताचे कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक होते.

ऐतिहासिक कारकीर्द
वेगवान धावपटू या नात्याने मिल्खा यांनी भारतीय ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी घडविली. 1958 साली कार्डिफ येथे झालेल्या तत्कालीन ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. 400 मीटर शर्यतीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या माल्कम स्पेन्स याला मागे टाकताना 46.6 सेकंद वेळ नोंदविली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा हे भारताचे पहिले ॲथलीट ठरले. त्यांचा हा विक्रम 50 पेक्षा जास्त वर्षे अबाधित राहिला. नवी दिल्लीत 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कृष्णा पुनिया हिने थाळी फेकीत सुवर्णपदक जिंकून मिल्खा यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मिल्खा यांनी 1956 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत 200 मीटर व 400 मीटर शर्यतीत सुवर्ण, तसेच १९६२ मधील आशियाई स्पर्धेत 400 मीटर व 4 बाय 400 मीटर रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 

ऑलिंपिक पदक हुकले
1960 मधील रोम ऑलिंपिक स्पर्धेत मिल्खा याना ब्राँझपदक अगदी निसटते हुकले. फोटो फिनिशमध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिले. तेव्हा त्यांनी रोम येथे नोंदविलेला 45.6 सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम 1998 साली परमजीत सिंग याने मोडला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com