हैदराबाद नॉर्थईस्टचे `मिशन टॉप फोर`

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी प्रमुख दावेदार आहेत.

पणजी: हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी प्रमुख दावेदार आहेत. वास्को येथील टिळक मैदानावर रविवारी  त्यांच्यातील सामन्यात `मिशन टॉप फोर`चे लक्ष्य राहील. आयएसएल स्पर्धेतील पहिले चार संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील. सध्या मुंबई सिटी, एटीके मोहन बागान, एफसी गोवा, हैदराबाद व नॉर्थईस्ट हे गुणतक्त्यातील पहिले पाच संघ आहेत. त्यात गोवा (+5), हैदराबाद (+4), नॉर्थईस्ट युनायटेड (+1) यांचे प्रत्येकी 15 सामन्यानंतर समान 22 गुण आहेत. रविवारी हैदराबाद व नॉर्थईस्ट यांच्यातील विजेता संघ तिसऱ्या क्रमांकावर येईल. बरोबरी झाल्यास हैदराबाद व नॉर्थईस्ट प्रत्येकी 23 गुणांसह पहिल्या चार संघात राहतील आणि एफसी गोवाची पाचव्या स्थानी घसरण होईल.

ISL चेन्नईयीन एफसी संघ कमनशिबी ठरला

हैदराबाद व नॉर्थईस्ट संघ सध्या जोमदार फॉर्ममध्ये आहेत. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हा संघ सात सामने अपराजित असून त्यात तीन विजय व चार बरोबरींचा समावेश आहे. मुख्य अंतरिम प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टने ओळीने तीन सामने जिंकल्यानंतर मागील लढतीत एफसी गोवास दोन वेळा पिछाडीवर राहूनही गोलबरोबरीत रोखले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथेच हैदराबादने नॉर्थईस्टला 4-2 फरकाने हरविले होते.

एटीके मोहन बागानसाठी आयती संधी फक्त एक विजय नोंदविलेल्या तळाच्या मोहन...

जमशेदपूरही शर्यतीत

प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीत जमशेदपूर एफसी संघही आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 15 लढतीतून 18 गुण आहेत. रविवारी डबल हेडरमधील पहिल्या लढतीत फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूरची गाठ दहाव्या क्रमांकावरील ईस्ट बंगाल संघाशी पडेल. हा सामना जिंकल्यास जमशेदपूरचा दावा कायम राहील. ईस्ट बंगालचे 15 लढतीतून 13 गुण आहेत. स्पर्धेतील भारतीय पंचगिरीवर अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फावलर यांना चार सामने निलंबित केले आहे, त्यामुळे रविवारच्या लढतीत ते संघाच्या डगआऊटमध्ये नसतील. कोलकात्यातील संघ पाच सामने विजयाविना आहे, त्यात तीन बरोबरी व दोन पराभवाचा समावेश आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादच्या आरिदाने सांताना याचे 7 गोल, 1 असिस्ट

- नॉर्थईस्ट युनायटेडच्या फेडेरिका गालेगो याचे 4 गोल, 4 असिस्ट

- नॉर्थईस्टचा नवा खेळाडू देशॉर्न ब्राऊन याचे 4 लढतीत 3 गोल, 1 असिस्ट

- हैदराबादचा हालिचरण नरझारी, नॉर्थईस्टचा लुईस माशादो यांचे प्रत्येकी 4 गोल

- हैदराबादच्या 5, तर नॉर्थईस्टच्या 3 क्लीन शीट्स

 

संबंधित बातम्या