Mohammad Azharuddin: पदार्पण असं असावं! पहिल्याच कसोटी मालिकेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड 38 वर्षांनंतरही अबाधित

मोहम्मद अझरुद्दीन यांनी 38 वर्षांपूर्वी केलेला मोठा विश्वविक्रम आजही कोणाला मोडता आलेला नाही.
Mohammad Azharuddin
Mohammad AzharuddinDainik Gomantak

Mohammad Azharuddin: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची कारकिर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली राहिली. भारताचा दिग्गज कर्णधार ते मॅच फिक्सिंगचा आरोप अशा अनेक चांगल्या वाईट घटना त्यांच्या कारकिर्दीत घडल्या.

दरम्यान, असे असले तरी त्यांचा एक विश्वविक्रम असा आहे, ज्याबद्दल नेहमीच त्यांचे कौतुक केले जाते. इतकेच नाही, तर त्यांचा हा विश्वविक्रम गेल्या 38 वर्षांत कोणाला मोडता आलेला नाही. त्यांच्या याच विक्रमाबद्दल जाणून घेऊ.

अझरुद्दीन यांचा 38 वर्षे जुना विक्रम

अझरुद्दीन यांनी त्यांचे कसोटी पदार्पण गाजवले होते. त्यांनी कसोटी पदार्पणानंतर पहिल्या तीन सामन्यांमध्ये शतकी खेळी करण्याचा विश्वविक्रम केला होता. त्यांचा हा विश्वविक्रम 38 वर्षांनंतरही अबाधित आहे.

Mohammad Azharuddin
IND vs AUS: 'हे' खेळाडू गाजवणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, नावावर करणार मोठे रेकॉर्ड

हैदराबादच्या अझरुद्दीन यांनी 31 डिसेंबर 1984 रोजी इंग्लंडविरुद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर कसोटी पदार्पण केले होते. हा इंग्लंडविरुद्ध 1984-85 साली झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना होता. त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच 110 धावांची शतकी खेळी केली होती.

त्यानंतर चेन्नईला 13-18 जानेवारी 1985 दरम्यान झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात त्यांनी 48 आणि 105 धावांच्या खेळी केल्या. तसेच कानपूरला 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या पाचव्या सामन्यात त्यांनी 122 आणि 54 धावांच्या खेळी केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावर कसोटी कारकिर्दीतील पहिल्या तीन सामन्यांत शतक करण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला.

आजोबांनी निवडलेली बॅट

अझरुद्दीन यांनी त्यांच्या पहिल्या तीन सामन्यांत जी बॅट फलंदाजी करताना वापरली होती, ती बॅट त्यांच्या अजोबांनी निवडलेली होती. याबद्दल अझरुद्दीन यांनी एकदा ट्वीट करत माहिती दिली होती. त्या बॅटने त्यांनी 800 पेक्षाही अधिक धावा केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Mohammad Azharuddin
Team India: 'प्लेअर ऑफ द मंथ' साठी या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा, ICC घेणार अंतिम निर्णय

तीन वर्ल्डकपमध्ये नेतृत्व

अझरुद्दिन हे भारताच्या उत्तम कर्णधारांमध्येही गणले जातात. त्यांनी भारताचे तीन वनडे वर्ल्डकपमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांनी 1992, 1996 आणि 1999 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळले होते. विशेष म्हणजे तीन वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारे ते एकमेव कर्णधार देखील आहेत.

मॅच फिक्सिंगचे आरोप

अझरुद्दीन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या असल्या तरी त्यांचे नाव साल 2000 मध्ये समोर आलेल्या मॅच फिक्सिंगचे प्रकरणात अडकले. त्यावेळी त्यांच्यावरही मॅच फिक्सिंगचे आरोप झाले.

त्यामुळे त्यांच्यावर बीसीसीआय आणि आयसीसीकडून बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही संपली. दरम्यान, काही काळाने त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न सापडल्याने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली होती. या वादग्रस्त प्रकरणानंतर आता अझरुद्दीन क्रिकेट प्रशासनात सक्रिय आहेत. सध्या ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

Mohammad Azharuddin
IND vs AUS: 'अश्विन चांगला गोलंदाज, पण आमच्याकडेही...', पहिल्या कसोटीपूर्वी स्मिथचा मोठा दावा

अझरुद्दीन यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

अझरुद्दीन यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 99 कसोटी सामने खेळले असून 45.03 च्या सरासरीने 6215 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 22 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 334 वनडे सामन्यांत 36.92 च्या सरासरीने आणि 7 शतके व 58 अर्धशतकांसह 9378 धावा केल्या आहेत.

याशिवाय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 229 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 54 शतकांसह 15855 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 432 लिस्ट ए सामन्यांमध्ये 11 शतकांसह 12931 केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com