पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला सोमवारी नामुष्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले. कोलकात्याच्या महम्मेडन स्पोर्टिंग क्लबने त्यांचा धुव्वा उडविताना 4 - 1 फरकाने विजय प्राप्त केला. सलग दुसरा सामना गमावल्यामुळे चर्चिल ब्रदर्स संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला.
गोकुळम केरळाविरुद्ध अगोदरचा सामना गमावलेल्या चर्चिल ब्रदर्सला 11 सामने अपराजित राहिल्यानंतर सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 25 गुण कायम राहिले. टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियनने (ट्राऊ) पंजाब एफसीला हरविल्यामुळे त्यांचेही 25 गुण झाले, मात्र गोलसरासरी सरस ठरल्यामुळे मणिपूरचा संघ अव्वल स्थानी आला असून चर्चिल ब्रदर्स संघ दुसऱ्या स्थानी घसरला. महम्मेडन स्पोर्टिंगने पाचव्या विजयाची नोंद करत 20 गुणांसह चौथ्या स्थानी प्रगती साधली.
तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन विराटसमोर धर्मसंकंट
महम्मेडन स्पोर्टिंगच्या विजयात हिरा मंडल याने 15व्या मिनिटास पहिला गोल केला. वनलालबिया छांगटे याने 65व्या मिनिटास संघाची आघाडी वाढविली. पेद्रो मांझी याने अखेरच्या टप्प्यात दोन गोल करून महम्मेडनच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पॅनिश आघाडीपटूने अनुक्रमे 86 व 90+3व्या मिनिटास गोल केला. चर्चिल ब्रदर्सचा एकमात्र गोल स्लोव्हेनियन लुका मॅसेन 21व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला.
ट्राऊ संघाची मुसंडी
कल्याणी येथे झालेल्या आणखी एका सामन्यात टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने पंजाब एफसीला 1-0 फरकाने पराभूत करून मुसंडी मारली. सामन्याच्या 81व्या मिनिटास ताजिकीस्तानचा आघाडीपटू कोमरॉन तुर्सुनोव याने थेट फ्रीकिकवर केलेला गोल ट्राऊ संघासाठी निर्णायक ठरला. त्यापूर्वी सामन्याच्या 79व्या मिनिटास पंजाब एफसीचा एक खेळाडू कमी झाला होता. त्यांचा बचावपटू महंमद इर्शाद याला थेट रेड कार्ड मिळाले. ट्राऊ एफसीचा हा सलग पाचवा विजय ठरला. एकंदरीत त्यांचा हा 13 सामन्यातील सातवा विजय ठरला व सरस गोलसरासरीमुळे 25 गुणांसह ते अव्वल स्थानी आले. पंजाब एफसीला 13 लढतीत चौथा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचा 19 गुणांसह पाचवा क्रमांक कायम राहिला.
बरोबरीमुळे गोकुळम केरळास धक्का
विजेतेपदाच्या शर्यतीतील गोकुळम केरळा संघाला सोमवारी बरोबरीमुळे धक्का बसला. त्यांना रियल काश्मीर एफसीने 1 - 1 गोलबरोबरीत रोखले. सामन्याच्या 13व्या मिनिटास बासित अहमद भट याने रियल काश्मीरला आघाडीवर नेल्यानंतर डेनिस अँटवी याने पेनल्टी फटक्यावर गोकुळम केरळास 24व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. 13 लढतीनंतर गोकुळम केरळाचे 23 गुण असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रियल काश्मीर संघ 13 लढतीनंतर 18 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
दृष्टिक्षेपात...
- ट्राऊ एफसी व चर्चिल ब्रदर्सचे समान 25 गुण
- गोलसरासरीत ट्राऊ (+11) अव्वल, तर चर्चिल ब्रदर्स (+4) दुसऱ्या स्थानी
- ट्राऊ संघाचे सलग 5 विजय, चर्चिल ब्रदर्सचे लागोपाठ 2 पराभव
- गोकुळम केरळा संघ 23 गुणांसह तिसऱ्या स्थानी
- महम्मेडन स्पोर्टिंग 20 गुणांसह चौथ्या क्रमांकावर
- पंजाब एफसी 19 गुणांसह पाचव्या, तर रियल काश्मीर 18 गुणांसह सहाव्या स्थानी