आयएसएल : एफसी गोवासमोर मातब्बर एटीके मोहन बागानचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात दुसऱ्या क्रमांकासाठी एटीके मोहन बागान आणि एफसी गोवा यांच्यात सध्या चुरस आहे.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात दुसऱ्या क्रमांकासाठी एटीके मोहन बागान आणि एफसी गोवा यांच्यात सध्या चुरस आहे. त्यांच्यात सध्या दोन गुणांचा फरक असून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. 17) होणारा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेल.

एटीके मोहन बागानचे 10 लढतीनंतर सहा विजयांसह 20 गुण आहेत, तर त्यांच्यापेक्षा एक सामना जास्त खेळलेल्या एफसी गोवाने पाच सामने जिंकत 18 गुण नोंदविले आहेत. रविवारी विजय नोंदविणाऱ्या संघास मुंबई सिटीनंतर दुसरा क्रमांक मिळेल. सामना बरोबरीत राहिल्यास अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची सध्याची स्थिती कायम राहील. एफसी गोवा पराभूत झाल्यास एटीके मोहन बागानला दुसरा क्रमांक कायम राखून मुंबई सिटी व त्यांच्यात असलेली गुणांची तफावत कमी करता येईल.

एफसी गोवा संघ चार सामने अपराजित आहे, तर पाच सामने अपराजित राहिलेल्या एटीके मोहन बागानला मागील लढतीत मुंबई सिटीकडून एका गोलने पराभव पत्करावा लागला होता. अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा बचाव भक्कम गणला जातो. दहापैकी सात सामन्यांत त्यांनी एकही गोल स्वीकारलेला नाही.

 

सर्व खेळाडू सज्ज : फेरांडो

ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने मागील लढतीत संघात काही बदल करूनही जमशेदपूरला 3 - 0 फरकाने हरविले होते. त्यात जोर्जे ओर्तिझने दोन गोल केले होते, तर नऊ गोल केलेला इगोर आंगुलो बेंचवर होता. फेरांडो यांनी सांगितले, की "सर्व खेळाडू मेहनत घेत असून सज्ज आहेत. शेवटचे सराव सत्र आटोपल्यानंतर लढतीसाठीचा संघ ठरविण्यात येईल. उत्कृष्ट खेळाडू खेळतील." एटीके मोहन बागान खूप चांगला संघ असून इतर सामन्यांप्रमाणे उद्याची लढतही महत्त्वाची असेल. आमचा तीन गुणांची संधी साधण्यावर भर राहील. आयएसएल स्पर्धेचा कालावधी खूप कमी असल्यामुळे प्रत्येक सामना निर्णायक आहे, असे मत फेरांडो यांनी व्यक्त केले.

 

दृष्टिक्षेपात...

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एटीके मोहन बागान 1-0 फरकाने विजयी

- एफसी गोवाचे 16, तर एटीके मोहन बागानचे 10 गोल

- एटीके मोहन बागानने फक्त 4, तर एफसी गोवाने 11 गोल स्वीकारलेत

- मागील 4 लढतीत एफसी गोवा अपराजित, 3 विजय, 1 बरोबरी

- एटीके मोहन बागानच्या 7, तर एफसी गोवाच्या 2 क्लीन शीट्स
 

संबंधित बातम्या