नरेंद्र मोदींचे महेंद्रसिंग धोनीला भावनिक पत्र

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

एरवी सोशल मीडियापासून चार हात लांब राहाणाऱ्या धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावरूनच केली आणि आज पंतप्रधानांनी त्याला लिहिलेले पत्र पोस्ट केले आणि मोदींनी त्याच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना जगासमोर आणल्या.

नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनीच्या अचानक निवृत्तीतून भारतीय क्रिकेट सावरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनीला भावनिक पत्र लिहून त्याचा गौरव केला आहे. नव्या पिढीच्या आपल्या देशात आपण कोणत्या कुटुंबातून आलो आहोत यावर नशीब ठरत नाही तर कर्तृत्व महान बनवते, अशा शब्दांत मोदींनी रांचीतून आलेल्या, पण क्रिकेट विश्‍वावर अधिराज्य गाजवलेल्या धोनीचे कौतुक केले आहे. 

एरवी सोशल मीडियापासून चार हात लांब राहाणाऱ्या धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावरूनच केली आणि आज पंतप्रधानांनी त्याला लिहिलेले पत्र पोस्ट केले आणि मोदींनी त्याच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना जगासमोर आणल्या. आपल्या देशातील नव्या पिढीत जिगरजागृत करण्यात तू एक अत्यंत महत्त्वाचा शिलेदार आहेस. जेथे आपल्यामागे कोणते नाव आहे हे महत्त्वाचे नसते, कोणतीही ओळख नसताना तू तुझे अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेस, असे पंतप्रधानांनी या पत्रात म्हटले आहे. 

देशाला दोन विश्‍वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीचा गौरव करताना पंतप्रधान पुढे म्हणतात... आपण कोठून येतोय याला काहीच महत्त्व नसते; परंतु आपल्याला कोणते ध्येय गाठायचेय याला सर्वाधिक प्राधान्य असते. या प्रवासात तू स्वतः मोठी झेप घेतलीसच, पण त्याचबरोबर नव्या पिढीला असाच प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित केलेस. 

पंतप्रधानांनी या पत्रात पुढे धोनीच्या ‘कॅप्टन कूल’ या गुणधर्माचेही कौतुक केले आहे. तुला कोणती हेअरस्टाईल पसंत पडते हे महत्त्वाचे नाही, पण त्याखाली असलेला शांत आणि संयमिपणा विजय आणि पराभवातही तेवढाच शांत असतो... कारकिर्दीच्या सुरुवातीस केस मानेवर रुळणाऱ्या धोनीने पुढच्या टप्प्यांत केशरचना बदलली, तरीही त्याचा स्वभाव बदलला नाही, असे मोदींनी सूचित केले. 

सर्वोत्तम कर्णधार आणि यशस्वी यष्टीरक्षक अशी शाबासकी देत पंतप्रधान म्हणतात, ‘‘कठीण परिस्थितीत स्वतःवर विश्‍वास ठेवण्याचा तुझा निडरपणा आणि स्वतःच्याच स्टाईलमध्ये सामना जिंकण्याची तुझी कला यातून २०११ च्या विश्‍वकरंडक विजेतेपदाच्या आठवणी जागृत करतात. ही आठवण पिढ्यानपिढ्या कायम राहील यात शंकाच नाही.’’ 

देशाला तुझा अभिमान
1 क्रिकेटमधील तुझा प्रभाव याचे वर्णन ‘अपूर्व’ अशा शब्दांत करणे योग्य ठरेल. एका छोट्याशा शहरातून तू आलास, राष्ट्रीय क्षितिजावर तुझे अस्तित्व दाखवून दिलेस, स्वतःला सिद्ध केलेस, आणि सर्वात म्हणजे देशाला अभिमान वाटेल असे यश मिळवलेस, अशीही भावना पंतप्रधानांनी या पत्रात व्यक्त केली आहे. 
2 २००७ च्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात नवोदित जोगिंदर सिंगला अंतिम षटक देण्याच्या निर्णयावर धोनीचे कौतुक करताना मोदी यांनी विचारपूर्वक धोका स्वीकारण्याच्या वृत्तीला सलाम केला. क्रिकेटच्या मैदानावर तू अशा प्रकारे केलेल्या वेगवेगळ्या, पण यशस्वी विचारांची आठवण नव्या पिढीच्या अनेक काळ स्मरणात राहिल. देशाची आपली नवी पिढी नवी आव्हाने स्वीकारण्यास सदैव तयार असून एकमेकांच्या क्षमतेला पाठिंबाही देत असतात. २००७ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील तुझ्या कल्पकतेने हे विचार रूढ केले, असे मोदी म्हणतात. 

सैनिक धोनीचेही कौतुक
भारतीय सैन्याविषयी आस्था बाळगणाऱ्या आणि गतवर्षी क्रिकेटपासून वेळ काढून लष्काराची सेवा करणाऱ्या धोनीचे कौतुक केले. आर्मी वेल्फेअरबाबतही तू आग्रही असतोस, असे मोदींनी म्हटले आहे. 

कौटुंबिक धोनी
खेळ आणि कौटुंबिक जीवन याचा समतोल कसा राखावा हे तू दाखवून दिले आहेस. २०१८ च्या आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यावर सर्व सहकारी आनंद साजरा करत होते, पण त्याच वेळी तुझी मुलगी झिवाबरोबर खेळत होतास, हाच ‘व्हिंटेज’ धोनी होता...

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या