एम एस धोनी नव्या भूमिकेत आणि तेही पुण्यात..!

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

कॅप्टन कुल म्हणून लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने यापूर्वीच क्रिकेट प्रशिक्षणात उडी घेतली आहे. आता त्याच्या ‘एमएसडी’ क्रिकेट अकादमीने पुण्यात मुहूर्तमेढ रोवली आहे.

पुणे- कॅप्टन कुल म्हणून लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने यापूर्वीच क्रिकेट प्रशिक्षणात उडी घेतली आहे. आता त्याच्या ‘एमएसडी’ क्रिकेट अकादमीने पुण्यात मुहूर्तमेढ रोवली आहे. अकादमीचे क्रिकेट संचालक असणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू डॅरेल कलिनन यांनी पुण्यात क्रिकेट मास्टर्स अकॅडमीच्या सहकार्याने ‘महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकादमी’ला सुरूवात झाल्याची घोषणा केली. 

यावेळी बोलताना कलिनन यांनी प्रशिक्षणाची वेगळी व्याख्याच ही अकादमी घालेल, असे सांगितले. ते म्हणाले, 'प्रशिक्षण ही एक विशिष्ट कला आहे. ती फक्त साधता यायला हवी. प्रशिक्षणाचे यश हे दोघांवर अवलंबून असते. म्हणजे आम्ही प्रशिक्षक काय शिकवतो आणि खेळाडू ते कसे आकलन करून घेतात यावर ते अवलंबून असते.’ 

सुरूवात करणारे, शिकाऊ आणि व्यावसाईक असे विभाग करणार असल्याचीही माहिती कलिनन यांनी दिली. क्रिकेट मास्टर्सचे अनिल वाल्हेकर यांनी स्थानिक क्रिकेटपटूंना सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे. तसेच त्यांना तंत्र आणि अधुनिक व्यायामाचे महत्त्व पटावे, यासाठी या अकादमीत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे सांगितले. 

गजेंद्र पवार यांनी क्रिकेट मास्टर्स अकादमीच्या स्थापनेपासूनचा प्रवास थोडक्‍यात सांगितला. आता महेंद्रसिंह धोनी यांच्या अकादमीशी एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान आणि आनंदही वाटत आहे, असे ते म्हणाले. 

महेंद्रसिंह धोनी अकादमीच्या प्रत्यक्ष कामास एक जानेवारीपासून सुरू होणार असून, प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ऑन लाईन पद्धतीने सुरूवात होणार आहे. अकादमीसाठी वर्षाला ३६ हजार रुपये इतकी फी असून, चार महिन्याला नऊ आणि सहा महिन्याला १८ हजार अशी फी भरण्याची मुभा आहे.  या वेळी रणजी खेळाडू बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अकॅडमीचे गजेंद्र पवार आणि अनिल वाल्हेकर, उमेश पाथरकर, अमोल माने उपस्थित होते.

संबंधित बातम्या