पणजी : सेनेगलचा मुर्तदा फॉलच्या भेदक हेडिंगच्या बळावर मुंबई सिटी एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग अकरा सामने अपराजित राहण्याचा पराक्रम शुक्रवारी साधला, त्याचबरोबर त्यांनी अग्रस्थानही मजबूत केले. त्यांनी ईस्ट बंगालवर 1 - 0 फरकाने विजय प्राप्त केला.
सामना शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. सेनेगलच्या मुर्तदा फॉलने 27 व्या अचूक हेडिंग साधत मुंबई सिटीस आघाडी मिळवून दिली. मुंबई सिटीने अग्रस्थान खूपच भक्कम करताना 29 गुणांसह आता पाच गुणांची निर्णायक आघाडी प्राप्त केली आहे. मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने मोसमात आठ सामने गोल न स्वीकारण्याची किमया साधली.
मुंबई सिटीने स्पर्धेतील सलग अपराजित मालिकेत नऊ विजय, दोन बरोबरीची नोंद केली. एकंदरीत सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा 12 लढतीतील नववा विजय ठरला. ईस्ट बंगालला सात लढतीनंतर पहिला पराभव पत्करावा लागला. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा 13 लढतीतील पाचवा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे 12 गुण आण दहावा क्रमांक कायम राहिला.
सेनेगलच्या मुर्तदा फॉल याने पूर्वार्धात कुलिंग ब्रेकपूर्वी केलेल्या गोलमुळे मुंबई सिटीला पूर्वार्धात एका गोलची आघाडी प्राप्त करता आली. हा गोल सेटपिसेसवर झाला. साय गोडार्ड याच्या कॉर्नर किक फटक्यावर मेहताब सिंग याने हेंडिगद्वारे चेंडूला ह्युगो बुमूसची दिशा दाखविली. बुमूसने पेनल्टी क्षेत्रात चेंडू क्रॉसपास केला. गोलक्षेत्राच्या डाव्या बाजूने अनमार्क असलेल्या मुर्तदा याने उडी घेत चेंडूला सुरेख हेडिंग द्वारे नेटची दिशा दाखविली.
विश्रांतीनंतर बाराव्या मिनिटास मुंबई सिटीच्या फॉल याला आणखी एक संधी होती. बुमूसच्या कॉर्नर किकवर फॉलचा फटका ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने वेळीस रोखल्यामुळे मुंबई सिटीची आघाडी वाढू शकली नाही. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत संधी मिळूनही ईस्ट बंगालला बरोबरी साधता आली नाही. अँथनी पिल्किंग्टन याचा फटका गोलपट्टीवरून गेला, तर पाच मिनिटे बाकी असताना स्कॉट नेव्हिल याचा प्रयत्न मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने विफल ठरविला.
दृष्टिक्षेपात...
- मुर्तदा फॉल याचे यंदा 2 गोल, एकंदरीत सेनेगलच्या बचावपटूचे 51 आयएसएल स्पर्धेत 11 गोल
- मुंबई सिटीचे यंदा 12 सामन्यांत सर्वाधिक 18 गोल
- मुंबई सिटीच्या ह्युगो बुमूसचे यंदा सर्वाधिक 6 असिस्ट
- ईस्ट बंगालचा 27 वर्षीय बचावपटू नारायण दासचे आयएसएल स्पर्धेत 100 सामने
- मुंबई सिटीच्या मंदार राव देसाईनंतर (105 सामने) आयएसएलमध्ये सामन्यांचे शतक नोंदविणारा नारायण दुसरा
- मुंबई सिटीच्या मोसमात 8 क्लीन शीट्स, एटीके मोहन बागानशी बरोबरी