ISL 2020-21 : मुंबई सिटीच्या धडाक्यासमोर ओडिशा गारद

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीअखेरीस लीग विनर्स शिल्ड पटकावण्याचा आशा कायम राखताना बुधवारी ओडिशा एफसीचा 6 - 1 फरकाने धुव्वा उडविला.

पणजी : मुंबई सिटीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीअखेरीस लीग विनर्स शिल्ड पटकावण्याचा आशा कायम राखताना बुधवारी ओडिशा एफसीचा 6 - 1 फरकाने धुव्वा उडविला. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. मुंबई सिटीच्या विजयात मध्यरक्षक बिपिन सिंगने हॅटट्रिक नोंदविली. त्याने अनुक्रमे 38, 47, 86 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदवत यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या हॅटट्रिकचा मान मिळविला. याशिवाय नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने दोन गोल केले, त्याने अनुक्रमे 14 व 43 व्या मिनिटास अचूक नेमबाजी साधली.

ISL 2020-21 : जमशेदपूरला सहाव्या क्रमांकासाठी बंगळूरचे आव्हान

याशिवाय जपानी खेळाडू साय गोडार्ड याने 44 व्या मिनिटास एक गोल करून मुंबई सिटीच्या विजयास हातभार लावला. सामन्याच्या नवव्याच मिनिटास ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने पेनल्टी फटका अचूक मारत ओडिशाला आघाडी मिळवून दिली होती.  सामन्याच्या 83 व्या मिनिटास मुंबई सिटीच्या अहमद जाहूस पेनल्टी फटक्यावर गोल करता आला नाही. 

मुंबई सिटीचा हा 19 लढतीतील अकरावा विजय ठरला. त्यांचा 37 गुणांसह दुसरा क्रमांक कायम राहिला. एटीके मोहन बागानचे 40 गुण आहेत. स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी रविवारी (ता. 28) एटीके मोहन बागानन मुंबई सिटी यांच्यातील सामना महत्त्वाचा असेल. साखळी विजेतेपदासह एएफसी चँपियन्स लीग पात्रतेसाठी एटीके मोहन बागानला त्या लढतीत बरोबरीचा एक गुण पुरेसा असेल, तर मुंबई सिटीसाठी विजय गरजेचा ठरेल. ओडिशा एफसीला स्पर्धेत 12 वा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 19 लढतीनंतर त्यांचे नऊ गुण आणि तळाचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

संबंधित बातम्या