मुंबई सिटीची विजयी हॅटट्रिक ; 'आयएसएल'च्या कालच्या सामन्यात ओडिशा एफसीवर दोन गोलनी सहज मात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

सफाईदार खेळ केलेल्या मुंबई सिटीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल विजयी हॅटट्रिक साधली. स्पर्धेतील मोहीम पराभवाने सुरू झाल्यानंतर ओळीने तिसरा विजय नोंदविताना त्यांनी पूर्ण वर्चस्व राखत ओडिशा एफसीला 2-0 फरकाने आरामात हरविले.

पणजी  :  सफाईदार खेळ केलेल्या मुंबई सिटीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल विजयी हॅटट्रिक साधली. स्पर्धेतील मोहीम पराभवाने सुरू झाल्यानंतर ओळीने तिसरा विजय नोंदविताना त्यांनी पूर्ण वर्चस्व राखत ओडिशा एफसीला 2-0 फरकाने आरामात हरविले.

 

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. मुंबई सिटीचा पहिला गोल 30व्या मिनिटास बार्थोलोमेव ओगबेचे याने पेनल्टी फटक्यावर नोंदविला. 45व्या मिनिटास रॉवलिन बोर्जिसने संघाची आघाडी वाढविली. मुंबई सिटीचा पूर्वार्धातील एक गोल रेफरीने अवैध ठरविला.

 

पहिल्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडकडून धक्कादायक पराभव पत्करलेल्या मुंबई सिटीचा हा एकही गोल न स्वीकारता सलग तिसरा विजय ठरला. त्यांचे चार लढतीतून आता नऊ गुण झाले असून गुणतक्त्यात एटीके मोहन बागानला गाठले आहे, मात्र मुंबईच्या संघास अव्वल स्थान मिळाले आहे. ओडिशा एफसीस तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचा एक गुण आणि दहावे स्थान कायम राहिले आहे. सर्जिओ लोबेरांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने शानदार अष्टपैलू खेळ केला. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळानंतर त्यांनी सूत्रे हाती घेतली. नियमित गोलरक्षक जखमी झाल्यानंतर स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाला खूपच सावध राहावे लागले.

 

नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने 30व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर मुंबई सिटीस आघाडी मिळवून दिली. यावेळी ओडिशाच्या शुभम सारंगी याने मुंबई सिटीच्या दक्षिणमूर्ती विग्नेश याला रोखण्याच्या नादात गोलक्षेत्रात चेंडू हाताळला. यावेळी रेफरी रणजित बक्सी यांनी मुंबई सिटीस पेनल्टी फटका दिल्यानंतर, 36 वर्षीय ओगबेचे याने गोलरक्षक कमलजित याच्या उजव्या बाजूने सणसणीत फटक्यावर चेंडूला अचूक दिशा दाखविली.

 

सामन्याच्या 34व्या मिनिटास मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉलचा हेडर भेदक ठरला होता, पण चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात फॉलशी गोलरक्षक कमलजितची टक्कर झाली, त्यामुळे रेफरींनी गोल अवैध ठरविला. अहमद जाहूच्या फ्रीकिकवर फॉलने उंच झेपावत चेंडूला अचूक दिशा दाखविली होती. धडक बसल्यामुळे कमलजित मैदानावर काही काळ निपचित पडला, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेत बदली गोलरक्षक रवी कुमार याला पाचारण करावे लागले.

 

पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटास गोमंतकीय मध्यरक्षक रॉवलिन बोर्जिसने मुंबई सिटीच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली. ह्युगो बुमूसने रचलेल्या शानदार चालीवर बिपिन सिंग याने बोर्जिसला अप्रतिम क्रॉस पास दिला, यावेळी 28 वर्षीय खेळाडूचा हेडर अडविणे गोलरक्षक रवी कुमारला शक्य झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- बार्थोलोमेव ओगबेचे याचे आता 38 आयएसएल सामन्यांत 28 गोल

- रॉवलिन बोर्जिसचे 67 आयएसएल लढतीत 7 गोल

- गतमोसमातील 2 पराभवानंतर मुंबई सिटीची ओडिशावर मात

- यंदाच्या स्पर्धेत मुंबई सिटी व नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रत्येकी 6 गोल

- ओडिशा एफसीवर प्रतिस्पर्ध्यांचे 6 गोल

- सामन्यात मुंबई सिटीचे चेंडूवर 67 टक्के, तर ओडिशाचे 33 टक्के प्रभुत्व

- मुंबई सिटीचे 604, तर ओडिशाचे 262 पास
 

 

अधिक वाचा :

एफसी गोवाची विजयाची प्रतीक्षा संपली ; केरळा ब्लास्टर्सला 3-1 फरकाने हरविले

जडेजा प्रकरणावरून एवढी चर्चा कशाला : सुनिल गावसकर

आयएसएलमध्ये आज एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स आमनेसामने, दुसऱ्या सामन्यात ओडिशा एफसी देणार मुंबई सिटीला टक्कर

संबंधित बातम्या