एफसी गोवाचे अस्त्र मुंबईच्या शस्त्रागारात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाने सेनेगलचा बचावपटू फॉल याच्याशी दोन वर्षांसाठी करार केला आहे.

पणजी- एफसी गोवा संघाच्या भात्यातील प्रभावी अस्त्र आता मुंबई सिटीच्या शस्त्रागारात समाविष्ट झाले आहे. प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या पाऊलखुणावरून मुर्तदा फॉल यानेही नव्या संघाशी घरोबा केला.
इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाने सेनेगलचा बचावपटू फॉल याच्याशी दोन वर्षांसाठी करार केला आहे.

२०१८-१९ व २०१९-२० असे दोन मोसम बचावफळीत हा चतुरस्त्र उंचपुरा फुटबॉलपटू एफसी गोवासाठी आधारस्तंभ ठरला होता. गोव्यातील संघाचे ४३ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना बचावफळीतील ३२ वर्षीय हुकमी खेळाडूने गोल नोंदविण्याचेही कसब प्रदर्शित केले. त्याने एफसी गोवातर्फे नऊ गोल आणि तीन असिस्टची नोंद केली. आयएसएल स्पर्धेत त्याने गोल नोंदविणारा बचावपटू ही आपली ओळख रुढ केली.

फॉल आणि स्पॅनिश प्रशिक्षक लोबेरा यांचे ऋणानुबंध जुने आहेत. लोबेरा मोरोक्कोतील मोघ्रेब तेतौआन संघाचे प्रशिक्षक असताना २०१४-१५ मोसमात फॉल त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. त्यानंतर २०१८-१९ मोसमात लोबेरा यांनी फॉलला एफसी गोवा संघात आणले.  

यापूर्वी आपण दोन वेळा लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे. त्यामुळे मुंबई सिटीचा प्रस्ताव आल्यानंतर लोबेरा यांच्याशी पुन्हा जोडण्याबाबत संधी मिळतेय हे पाहून आपणास दोन वेळा विचार करावा लागला नाही, असे फॉल याने मुंबई सिटीशी करार करण्याविषयी सांगितले. मुर्तदा हा मैदानावर, तसेच मैदानाबाहेरही कसलेला व्यावसायिक आहे. त्याच्यापाशी भरपूर अनुभव आहे, तरीही शिकण्यासाठी आणि आणखी उत्कृष्ट बनण्यासाठी तत्पर असतो, असे लोबेरा यांनी हुकमी बचावपटूविषयी सांगितले. 

संबंधित बातम्या