पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीचा आयएसएलमधील पहिला विजय ; एफसी गोवावर 1-0 ने मात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

सामन्याच्या पाच मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास एडम ले फाँड्रे याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील पहिला विजय नोंदविला.

पणजी : सामन्याच्या पाच मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास एडम ले फाँड्रे याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील पहिला विजय नोंदविला. त्यांनी दहा खेळाडूंसह खेळण्याऱ्या एफसी गोवास 1-0 फरकाने हरविले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीकडे सर्जिओ लोबेरा विरुद्ध एफसी गोवा या नजरेने पाहिले जात होते. त्यात मुंबई सिटीच्या विजयामुळे गोव्यातील संघाच्या माजी प्रशिक्षकांचीच सरशी झाली. पहिल्या लढतीत नॉर्थईस्टकडून एका गोलने पराभूत झालेल्या मुंबई सिटीने तीन गुणांसह खाते उघडले. बंगळूर एफसीला गोलबरोबरीत रोखलेल्या एफसी गोवास पराभवामुळे एका गुणासह राहावे लागले. मुंबई सिटीचा कर्णधार गोलरक्षक अमरिंदर सिंग याची चपळाईने एफसी गोवासाठी अडथळा ठरली.

इंज्युरी टाईममध्ये गोलक्षेत्रात मुंबई सिटीच्या बिपिन सिंगच्या हेडरवर चेंडूने एफसी गोवाच्या लेनी रॉड्रिग्ज याच्या हाताचा वेध घेतला. हँडबॉलमुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली. ऑस्ट्रेलियातील ए-लीग स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या ब्रिटिश एडम ले फाँड्रे याने एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाज याला सहजपणे गुंगारा देत मुंबई सिटीचा विजय पक्का केला.

विश्रांतीला पाच मिनिटे बाकी असताना एफसी गोवास जबर धक्का बसला. रेडीम ट्लांगला थेड रेड कार्ड मिळाल्यामुळे फेरॅन्डोंच्या मार्गदर्शनाखालील संघाचा एक खेळाडू कमी झाला. मैदानावर घासत चेंडूवर ताबा मिळविण्याच्या नादात रेडीम स्वतःवर ताबा राखून शकला नाही. मुंबई सिटीच्या हर्नान सांताना याच्या पायावर त्याची जोरदार लाथ बसली. रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी थेट रेड कार्ड दाखविल्यामुळे शिलाँगचा रहिवासी असलेल्या रेडीमला निराशेने मैदान सोडावे लागले.

पूर्वार्धात दोन्ही संघांनी अपेक्षेनुसार अधिकाधिक चाली रचण्यावर भर दिला, पण गोल होण्याइतपत आक्रमणात भेदकता नव्हती. तुलनेत एफसी गोवाचा चेंडूवर जास्त ताबा राहिला. मुंबई सिटीचा महागडा ह्युगो बुमूस एफसी गोवाच्या नजरकैदेत राहिला. एक खेळाडू कमी झाल्यानंतर उत्तरार्धाच्या सुरवातीपासूनच एफसी गोवाने आक्रमणावर लक्ष केंद्रित केले. मुंबई सिटीची आक्रमणे दिशाहीन ठरल्याने त्यांना आघाडीपासून दूर राहावे लागले.

विश्रांतीनंतर पहिल्याच मिनिटास एफसी गोवाच्या इगोर आंगुलो याला स्पर्धेतील तिसरा गोल करण्याची संधी होती, परंतु फटक्यासाठी तो जागा मिळवू शकला नाही आणि मुंबई सिटीचे नुकसान झाले नाही. विश्रांतीनंतरच्या सातव्या मिनिटास मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याच्या दक्षतेमुळे एफसी गोवास आघाडी मिळाली नाही. अमरिंदरने एदू बेदियाचा फटका उजवीकडे झेपावत फोल ठरविला. तासाभराच्या खेळानंतर एफसी गोवाने आक्रमणात महत्त्वाचा बदल केला. इगोर आंगुलोच्या जागी जॉर्ज ऑर्टिझ याला मैदानात उतरविण्यात आले. सामना संपण्यास पंधरा मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीने जवळपास आघाडी घेतली होती, परंतु मंदार राव देसाई चेंडूवर ताबा राखून शकला नाही आणि संधी हुकली.

संघात दोन बदल

एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो यांनी बुधवारच्या लढतीसाठी संघात दोन बदल केले. बंगळूर सिटीविरुद्ध खेळलेल्या संघातील सॅनसन परेरा व प्रिन्सटन रिबेलो यांच्याऐवजी बचावपटू सेवियर गामा व मध्यरक्षक रेडीम ट्लांग यांना स्टार्टिंग लाईनअपमध्ये घेतले. मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी आघाडीफळीत बार्थोलोमेव ओगबेचे याच्याऐवजी साय गोडार्ड याला प्राधान्य दिले.

दृष्टिक्षेपात...

- आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीचे आता एफसी गोवाविरुद्ध 5 विजय

- 15 आयएसएल लढतीत एफसी गोवाचे 7, मुंबई सिटीचे 5 विजय, 3 बरोबरी

- यापूर्वी 2018-19 मोसमात फातोर्डा येथेच मुंबई सिटीचा एफसी गोवावर शेवटचा विजय (1-0)

- लढतीत मुंबई सिटीचे ४४६, तर एफसी गोवाचे ३३५ पास

 

चेन्नईयीनच्या दोन गोलमुळे जमशेदपूरचा पडाव

एफसी गोवाची नजर पूर्ण तीन गुणांवर

संबंधित बातम्या