आयएसएल 2020: लोबेरा यांची यंदा करंडकासाठी दावेदारी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

एफसी गोवा संघात लोबेरा यांचे आक्रमक तत्त्वज्ञान प्रकाशमान झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आयएसएलच्या तीन मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला. यावेळी मुंबई सिटीसाठी प्रथमच आयएसएल करंडक जिंकण्याचा कयास आहे.

पणजी- एफसी गोवाचे प्रशिक्षक या नात्याने स्पॅनिश सर्जिओ लोबेरा यांच्यासाठी इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे तीन मोसम यशस्वी ठरले, पण त्यांना करंडक जिंकता आला नाही. आता मुंबई सिटी एफसीसोबत नव्या प्रवासाला आरंभ करण्यास ते सज्ज 
आहेत.

एफसी गोवा संघात लोबेरा यांचे आक्रमक तत्त्वज्ञान प्रकाशमान झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आयएसएलच्या तीन मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला. आता आपल्यासमवेत लोबेरा यांनी एफसी गोवातील प्रमुख खेळाडू मुंबई सिटीत आणले आहेत. त्यामुळे लोबेरा यांना कदाचित आपल्या मार्गाने जाता येईल आणि यावेळेस ते वैयक्तिक आणि मुंबई सिटीसाठी प्रथमच आयएसएल करंडक जिंकण्याचा कयास आहे.

जून २०१७ मध्ये एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी लोबेरा यांच्या नावाची घोषणा झाली. आयएसएलमधील त्यांचे पदार्पण विजयाने झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पहिल्याच लढतीत एफसी गोवाने चेन्नईयीन एफसीला हरविले. त्याच मोसमात एफसी गोवाने स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली. २०१८-१९ मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आयएसएलची अंतिम फेरी गाठली, पण अंतिम लढतीत बंगळूर एफसीकडून पराभव पत्करावा लागला. मात्र २०१९ मध्ये सुपर कप जिंकताना एफसी गोवाने चेन्नईयीन एफसीला हरविले. एफसी गोवाच्या इतिसाहातील हा पहिलाच करंडक ठरला. स्पॅनिश प्रशिक्षकासाठी २०१९-२० मोसम नाट्यमय ठरला. सातत्य राखत एफसी गोवा संघ साखळी फेरीत अव्वल होता आणि अजून मोसम बाकी असताना परस्पर सामंजस्य कराराद्वारे लोबेरा यांनी एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. २०२०-२१ मोसमापूर्वी त्यांची मुंबई सिटी एफसीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली.

संबंधित बातम्या