ISL 2020-21 : एटीके मोहन बागानला हरवून मुंबई सिटी एफसी चॅम्पियन्स लीगसाठीही पात्रता

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात साखळी फेरीत अग्रेसर ठरत रविवारी मुंबई सिटी एफसीने लीग विनर्स शिल्डचा मान प्राप्त केला.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात साखळी फेरीत अग्रेसर ठरत रविवारी मुंबई सिटी एफसीने लीग विनर्स शिल्डचा मान प्राप्त केला. एटीके मोहन बागानवर पूर्वार्धातील गोलच्या बळावर त्यांनी 2-0 फरकाने मात करून एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठीही थेट पात्रता मिळविली.

सामना रविवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. साखळी फेरीत अव्वल ठरण्यासाठी मुंबई सिटीस विजय अत्यावश्यक होता, तर एटीके मोहन बागानला बरोबरी पुरेशी होती. मात्र पूर्वार्धात सातव्या मिनिटास सेनेगलचा बचावपटू मुर्तदा फॉल याने आणि 39व्या मिनिटास नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे यांनी लक्ष्य साधत सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची मोसमातील पहिली स्वप्नपूर्ती केली. दोन्ही गोल सेटपिसेसवर हेडिंगद्वारे झाले. एटीके मोहन बागानला सदोष नेमबाजीचा फटका बसला, त्यामुळे त्यांना पिछाडी भरून काढता आली नाही.

ISL 2020-21 : हैदराबादला गोलशून्य बरोबरीत रोखून एफसी गोवा प्ले-ऑफ फेरीत दाखल

मुंबई सिटीचा हा अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानवरील सलग दुसरा विजय ठरला. पहिल्या टप्प्यातही मुंबईच्या संघाने कोलकात्यातील संघावर एका गोलने मात केली होती. एकंदरीत मुंबई सिटीचा हा 20 लढतीतील 12वा विजय ठरला. त्यांचे 40 गुण झाले. सलग पाच विजय व बरोबरीनंतर एटीके मोहन बागान संघ पराभूत झाला. एकंदरीत 20 लढतीतील त्यांचा हा चौथा पराभव ठरला, त्यामुळे त्यांना 40 गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरावे लागले. गोलसरासरीत मुंबई सिटीने (+17) एटीके मोहन बागानला (+13) मागे टाकले, तसेच मुंबईचा संघ हेड-टू-हेड निकालातही सरस ठरला. नॉर्थईस्ट युनायटेड (33 गुण) व एफसी गोवा (31 गुण) हे प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीतील अन्य दोन संघ आहेत.

I League : चर्चिल ब्रदर्सची सलग तीन सामने जिंकलेल्या गोकुळम केरळाविरुद्ध लढत

अगोदरच्या लढतीत ओडिशा एफसीचा 6-1 फरकाने धुव्वा उडविलेल्या मुंबई सिटीने पूर्वार्धातील खेळात एटीके मोहन बागानवर 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. दोन्ही गोल सेटपिसेसवर झाले. सामन्याच्या प्रारंभीच सेनेगलचा बचावपटू मुर्तदा फॉल याच्या भेदक हेडरसमोर एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज हतबल ठरला. फॉल याचा हा आयएसएलमधील हेडिंगवरील बारावा गोल ठरला. अहमद जाहू याच्या सणसणीत फ्रीकिकवर फॉल याने मैदानाच्या उजव्या भागातून अप्रतिम हेडिंग साधले. विश्रांतीस सहा मिनिटे बाकी असताना सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची आघाडी वाढली. स्पॅनिश खेळाडू हर्नान सांताना याचा फ्रिकिक फटका गोलपट्टीस आपटून माघारी आला, त्यावेळी रिबाऊंडवरील बार्थोलोमेव ओगबेचे याचे हेडिंग बिनतोड ठरले. सामन्याच्या 19व्या मिनिटास हुकमी बचावपटू संदेश झिंगन याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्याचा परिणामही एटीके मोहन बागानच्या कामगिरीवर झाला.

दृष्टिक्षेपात,,,

- 33 वर्षीय मुर्तदा फॉल याचे यंदा 19 लढतीत 3 गोल, आयएसएलमधील एकंदरीत 59 लढतीत 12 गोल, सर्व हेडरद्वारे

- 36 वर्षीय बार्थोलोमेव ओगबेचे याचे मोसमात 20 लढतीत 8 गोल, आयएसएलमध्ये एकूण 54 लढतीत 35 गोल

- मुंबई सिटीचे एटीके मोहन बागानवर सलग 2 विजय, पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे 1-0 फरकाने सरशी

- मुंबई सिटीचे यंदा स्पर्धेत सर्वाधिक 35 गोल

- मुंबई सिटीच्या यंदा 9 क्लीन शीट्स, एटीके मोहन बागानपेक्षा 1 कमी

संबंधित बातम्या